५२९७ पदांसाठी तब्बल १२ लाख इच्छुक : बेरोजगारीची दाहकता स्पष्ट
लोकमत विशेष
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील वाढत्या बेरोजगारीचे दाहक वास्तव पोलीस भरतीच्या निमित्ताने समोर आले आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ५२९७ पदांसाठी तब्बल ११ लाख ९७ हजार उमेदवार इच्छुक आहेत. म्हणजे सरासरी २२६ जणांमधून एक जागा भरली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील २०१९ च्या भरतीसाठी करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाची ही आकडेवारी आहे. या भरती प्रक्रियेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. या अर्जांची छाननी केली जात आहे. येत्या महिन्याभरात ती कार्यान्वित केली जाईल, असे पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने कॉन्स्टेबलची साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन जाहीर केले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेली ५,२९७ पदे भरण्यात येणार आहेत. फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात २०१९ मध्ये खात्यातील ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी महापोर्टल या वेबसाइटवर अर्ज मागविण्यात आले होते. विविध पोलीस घटकनिहाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी डिसेंबरअखेरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, महापोर्टलद्वारे अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने इच्छुकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने ते पोर्टल बंद करून भरती प्रक्रिया रद्द केली होती. मात्र, त्याद्वारे केलेले सर्व अर्ज ग्राह्य धरण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यावेळच्या सर्व अर्जाचे संकलन करून २०१९ पर्यंतच्या रिक्त पदाची भरती प्रक्रिया सध्या राबविली जात आहे.
भरतीच्या पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये जाहीर केलेली पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण प्रक्रिया पारदर्शी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन राबवविण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना करण्यात आल्या आहेत.
- सतेज पाटील (गृहराज्यमंत्री, शहरे)
(उद्याच्या अंकात- भरतीत पहिल्यादा लेखी परीक्षाच होणार)