अबब ! न्यायालयातही चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:11+5:302021-09-02T04:14:11+5:30
निकाली काढलेल्या केसपेपरचे ३० ते ३५ गठ्ठे चोरीला मनिषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चोरी करण्यासाठी चोरट्यांची नजर ...
निकाली काढलेल्या केसपेपरचे ३० ते ३५ गठ्ठे चोरीला
मनिषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चोरी करण्यासाठी चोरट्यांची नजर कुठे पडेल आणि कितीही कडक सुरक्षा व्यवस्था असली ते कोणते धाडस करतील, हे सांगणे कठीण आहे. ज्या न्यायालयात गुन्हेगारांच्या शिक्षेचा फैसला केला जातो. त्याच न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायालयातील स्टोअर रूमचे लॉक तोडून केसपेपरचे ३० ते ३५ गठ्ठेच चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी २७ वे न्यायालयात घडला आहे. येथील शिरस्तेदार म्हणून कार्यरत असलेले प्रसाद सावंत (५१) यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी सोमवारी मुलुंड पोलीस ठाण्यात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास एका खटल्यातील कागदपत्राची नक्कल मिळण्यासाठी संबंधित वकील अर्जदार चौकशीकामी कार्यालयात आले होते. कोर्टातून निकाली काढलेल्या प्रकरणाची कागदपत्रे स्टोअर रुममध्ये पांढऱ्या रंगाच्या कापडाच्या गठ्ठ्यात बांधून ठेवली जातात. त्यानुसार लिपिक महिला कर्मचारी यांनी महिला पोलीस शिपाईला महानगर दंडाधिकारी, २७ वे न्यायालयाच्या स्टोअर रुममधून केस पेपर आणण्यास सांगितले.
महिला पोलीस शिपाई एक कर्मचाऱ्याला घेऊन स्टोअर रूमकडे गेल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप उघडलेले दिसले. त्यांनी या रुममध्ये प्रवेश केला असता न्यायालयीन प्रकरणातील निकाली काढलेल्या केस पेपरचे ३० ते ३५ गठ्ठे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. न्यायालयात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.
न्यायालयातील शिरस्तेदार सावंत यांना ही बाब समजताच त्यांनी महिला शिपाईकडे अधिक विचारणा केली. महिला शिपाईने यापूर्वी एकदा काही दिवसांपूर्वी रूममधून काही पेपर काढले होते. त्यानंतर रुम व्यवस्थित बंद करून लाॅक लावले असल्याचे सांगितले. सावंत यांनी ही बाब वरिष्ठ न्याय दंडाधिकारी यांना सांगितली. त्यांनी स्टोअर रुमची पाहणी करून याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सावंत यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
..
चौकशी सुरू...
न्यायालयातील चोरीप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. यामध्ये निकाली लागलेल्या प्रकरणांची कागदपत्रे होती. तसेच सर्व डाटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याची माहिती मिळते आहे. यात कचरा वेचक तसेच रद्दी गोळा करणाऱ्यांवर संशय असून, अधिक तपास सुरू आहे.
- विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुलुंड पोलीस ठाणे.