Join us

लहान मुलांच्या संगोपनात पालकांना मदत करण्यासाठी 'ग्रो राईट' अभियानाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 8:45 PM

पालकांच्या मदतीसाठी अ‍ॅबॉटचा उपक्रम

मुंबई: लहान मुलांचं संगोपन अतिशय अवघड असतं. बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, वातावरणातील बदल, गॅजेट्सचा अतिवापर यामुळे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यासाठी अ‍ॅबॉटनं 'ग्रो राईट' उपक्रम सुरू केला आहे. यासाठी अ‍ॅबॉटनं मॉम्सप्रेसो कंपनीशी भागिदारी केली आहे. पूर्ण क्षमतांसह मुलांची वाढ करुन त्यांना एक उत्तम भविष्य मिळावं या उद्देशानं अ‍ॅबॉटकडून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 'ग्रो राईट'च्या माध्यमातून मुलांच्या योग्य वाढीसाठी मातांना मदत करणारा 'ग्रो राईट चार्टर' तयार करण्यात येईल. तज्ज्ञांची एक गिल्ड या चार्टरची निर्मिती करणार आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई, पोषणतज्ज्ञ डॉ. एलीन कॅडे, डॉ. धारिणी कृष्णन आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. मुकेश संकलेचा यांचा समावेश आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या तज्ज्ञांनी मनमोकळा संवाद साधत मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. राईट न्यूट्रिशन, राईट प्ले, राईट नर्चर, राईट इम्पॅक्ट ही चार सूत्रं यातून पुढे आली.पुढच्या पिढीला चांगलं आरोग्य देणं हे आता एक आव्हान आहे आणि त्यासाठीच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचं अ‍ॅबॉटचे भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक विकास प्रसाद यांनी सांगितलं. मुलं लहान असताना त्यांचा मेंदू वेगानं विकसित होत असतो आणि बाह्य वातावरणाबद्दल तो अतिशय संवेदनशील असतो, असं डॉ. कृष्णन यांनी म्हटलं. मुलांना कसं घडवावं, त्यांचं उत्तम पोषण व्हावं यासाठी नेमकं काय द्यावं, असे प्रश्न मातांना पडतात. त्यावर कृष्णन यांनी अगदी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. पालक जे खातात, तेच मुलं खातात. मुलं पालकांचांचं अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी कृतीतून मुलांना योग्य वळण लावावं, असं त्या म्हणाल्या. हातात मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. यावर डॉ. मुकेश संकलेचा यांनी मार्गदर्शन केलं. मुलं व्यवस्थित मोबाईल हाताळतात, हे कौतुकास्पद नसून घातक असल्याचं ते म्हणाले. मुलांच्या हातात किती वेळ मोबाईल द्यायचा हे पालकांनी ठरवण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय पाल्यानं मोबाईल, टीव्हीवर काय पाहावं, याकडेही कटाक्षानं लक्ष देण्याची गरज आहे, असं संकलेचा यांनी म्हटलं. मोबाईलमध्ये गुंग होणारी मुलं पुढे कोणाशी फार बोलत नाहीत, मिसळत नाहीत. त्याचे खूप भीषण परिणाम भविष्यात पाहायला मिळतात, असं म्हणत त्यांनी विषयाचं गांभीर्य अधोरेखित केलं. डॉ. समीर दलवाई यांनी मोबाईलचं वेड अंमली पदार्थांपेक्षा घातक असल्याचं म्हणत पालकांना धोक्याचा इशारा दिला. याशिवाय त्यांनी मुलांच्या पोषणावर अगदी मोजक्या शब्दांत महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. मुलांवर जबरदस्ती करू नका. भूक नसेल तर त्यांना उगाच ताटातलं सर्व संपवायला लावू नका. किती खायचं ते त्यांना ठरवू द्या. पण त्यांनी काय खायचं ते तुम्ही ठरवा, असं दलवाई म्हणाले. मुलांच्या संगोपनात आपण कमी तर पडत नाही, अशी भावना पालकांच्या मनात असते आणि त्यामुळे ते बरंच काही करायला जातात. यामुळेच कधीकधी घोळ होतो, असंदेखील त्यांनी म्हटलं. मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्यांना त्या प्रक्रियेत सहभागी करुन घ्या, असा मोलाचा सल्ला अभिनेत्री लारा दत्तानं दिला. अनेकदा मुलं जेवणाच्या बाबतीत हट्ट करतात. अशावेळी त्यांना समजावून सांगा. कारण मुलांना जबरदस्ती केलेली आवडत नाही. एखादी भाजी त्यांना खायला देणार असाल, तर त्या भाजीच्या खरेदीपासून ती ताटात वाढेपर्यंतच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्या. भाजी करताना त्यांना थोडी मदत करायला सांगा. त्यामुळे त्यांना हळूहळू सगळ्याच गोष्टींविषयी आपलेपणा वाटतो. कायम मुलांसाठी धावून जाण्याऐवजी त्यांना जबाबदारी द्या, असं लारा म्हणाली.