Join us

मेडिक्लेम मंजूर झाला नाही म्हणून कर्मचाऱ्याचं अपहरण करून मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 7:05 PM

१७ मार्च रोजी दीक्षित यांच्या फिर्यादीनंतर मीरारोड पोलिसांनी चौघांवर अपहरण , खंडणी, मारहाण आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोड - मेडिक्लेम मंजूर झाला नाही म्हणून कर्मचाऱ्याचे अपहरण करून, त्याला मारहाण करत पैशांची मागणी केल्याप्रकरणी मीरारोड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संजयकुमार दीक्षित (रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, न्यु राजीव गांधी शाळेजवळ, उमराळे, नालासोपारा) हे नेक्सस हेल्थ केअरमध्ये नोकरी करतात. शिमांचल मिश्रा, राजेश मिश्रा आणि रोहित मिश्रा यांच्या वडिलांचा हेल्थ इंन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम काही करणास्तव पास झाला नाही. १६ मार्च रोजी शिमांचल याने दीक्षित यांना कनकीया आर. बी. के स्कुलसमोर बोलावले. शिमांचल, राजेश, रोहित यांनी दीक्षित यांना गाडीत बसवून क्लेम पास न झाल्याने मारहाण सुरु केली. क्लेमचे पैसे दे असे म्हणत आणि गाडी फिरवत मारहाण सुरू होती. सेव्हन क्लब समोर गाडी थांबवून त्यांनी कृष्णा नावाच्या व्यक्तीस बसवले. एवढेच नाही, तर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला, पोलीसांत तक्रार केली तर आणखी मारू, असे धमकावले आणि भाईंदर पुर्व रेल्वे स्थानकाजवळ सोडले . 

१७ मार्च रोजी दीक्षित यांच्या फिर्यादीनंतर मीरारोड पोलिसांनी चौघांवर अपहरण , खंडणी, मारहाण आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस