लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विवाहित प्रेयसीसोबत भांडण झाल्याने दारूच्या नशेत तिच्या सात वर्षांच्या गतिमंद मुलीला एक इसम घेऊन निघून गेला. या प्रकरणी तिच्या आईने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी चिमुरडीची सुटका करून दारूच्या नशेत असलेल्या आरोपीला गजाआड केले.
अब्दुल मलिक सफिकुल आलम शेख (४०) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बेरोजगार असून अधूनमधून केटरिंगचे काम करतो. त्याचे एका ३८ वर्षांच्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. तिचा पती दिव्यांग असून सात वर्षांची मुलगीही गतिमंद आहे. शेख वरचेवर तिच्या घरी ये-जा करीत होता. मात्र शुक्रवारी २६ फेब्रुवारीला तो तिच्या घरी दारूच्या नशेत पोहोचला. त्यात त्यांचे भांडण झाले आणि त्याच रागात तो तिच्या सात वर्षांच्या मुलीला उचलून बाहेर निघून गेला.
बराच वेळ होऊनही तो न परतल्याने घाबरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कंदळगावकर यांच्या पथकाने इराणीवाडी परिसरातून शेखला ताब्यात घेतले.