अल्पवयीन मुलीचे कुर्ल्यातून अपहरण; आरेत बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:06+5:302021-07-28T04:06:06+5:30
गर्दुल्ल्याला पोलिसांकडून अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चायनीज खायला देण्याचे आमिष दाखवत सात वर्षांच्या मुलीचे कुर्ला परिसरातून अपहरण ...
गर्दुल्ल्याला पोलिसांकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चायनीज खायला देण्याचे आमिष दाखवत सात वर्षांच्या मुलीचे कुर्ला परिसरातून अपहरण करत नंतर तिच्यावर गोरेगावच्या आरे परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी आरे पोलिसांनी मंगळवारी २२ वर्षीय गर्दुल्ल्याला अटक केली आहे.
आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरेच्या युनिट क्रमांक ३२ येथे लहान मुलीच्या रडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. चौकशीत पीडित मुलगी ही कुर्ल्याची राहणारी असून ती घरासमोर खेळत असताना हा आरोपी त्यांच्या दरवाजावर गेला. तो भिकारी आहे असे समजून त्याला काही तरी खायला आणण्यासाठी मुलीची आई घरात गेली. त्या दरम्यान तुला चायनीज खायला देतो, असे सांगत तो तिला सोबत घेऊन गेला. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच घरच्यांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला आणि नंतर कुर्ला पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
आरोपीला अमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन असून तो गोरेगावच्या संतोषनगरचा राहणारा आहे. लहान मुलीच्या अपहरणाचा गुन्हा त्याच्यावर दिंडोशी पोलिसांत २०१६ मध्येही दाखल झाला होता. मात्र, त्यावेळी तो अल्पवयीन होता. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.