मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन १ महिना होत आला तरी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून कोंडी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी आपला नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे नेमकं विस्तार का रखडला याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी ३ तारखेच्या आत कधीही मंत्रीमंडळ विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. यातच कोणते जिल्हे ते घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळणार, त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती मंत्री मंत्री होणार याबाबत वाटाघाटी झाली असावी. मात्र अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मला असं वाटत पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि आगामी ३ ऑगस्टपूर्वी १०१ टक्के मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्यानंतर आता आणखी मोठी खाती देण्याच्या मनस्थितीत भाजपा नाही. मात्र जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. दोन्ही बाजूच्या रस्सीखेचामुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने मंत्रिमंडळ रखडल्याचं बोललं जात आहे.
एक किंवा दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. दोन टप्प्यात झाले तर पहिल्या टप्प्यात १९ मंत्री शपथ घेतील त्यात भाजपाचे १२ आणि शिंदे गटाचे ७ असे शपथ घेतील. तर एकाच टप्प्यात घ्यायचं ठरवलं तर २६ भाजपा आणि १४-१५ शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र मंत्रिमंडळ सदस्य संख्येवर शिंदे-भाजपा यांच्यात एकमत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.