राजीनाम्याची पुडी कोणी सोडली याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली - अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:06 PM2020-01-05T13:06:31+5:302020-01-05T13:48:47+5:30
राजीनाम्याची अफवा कुणी पसरवली याबाबतची माहिती अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली
मुंबई - शनिवारी औरंगाबादेत रंगलेल्या नाराजीनाट्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या भेटीत सत्तार यांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, गटबाजीवर सर्विस्तर चर्चा झाली. तसेच आपल्या राजीनाम्याची अफवा कुणी पसरवली याबाबतची माहिती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मी नाराज नाराज नाही, पक्षाचे काम करत राहणार, असे सत्तार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना सांगितले. तसेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही सत्तार यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ''आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेवेळी मी माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली. आता उद्धव ठाकरे औरंगाबादमधील इतर नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मी उद्या पुन्हा एकदा पक्षप्रमुखांना भेटणार आहे. दरम्यान, मी नाराज नाही, मी पक्षाचे काम करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवडाभरापासून नवनियुक्त मंत्र्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज सकाळी जाहीर झाले आहे. दरम्यान,खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात महत्त्वाची खाती टाकली आहे. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झालेल्या सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदारी असणार आहे.
केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याच्या वृत्ताने शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपास विलंब होत असतानाचा अब्दुल सत्तार यांच्या नाराजीने शनिवारी शिवसेनेची चिंता वाढवली होती. राज्यमंत्रिपदावरच बोळवण झाल्याने सत्तार यांनी खातेवाटप होण्यापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचेही वृत्त धडकले होते. मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यशस्वी शिष्टाई करत सत्तार यांच्या नाराजीवर पांघरूण घातले होते. दरम्यान, आज अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत आपली तक्रार मांडली. आपल्याविरोधात काही जण मुद्दामहून अफवा पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याच्या वृत्ताने शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपास विलंब होत असतानाचा अब्दुल सत्तार यांच्या नाराजीने शनिवारी शिवसेनेची चिंता वाढवली होती. राज्यमंत्रिपदावरच बोळवण झाल्याने सत्तार यांनी खातेवाटप होण्यापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचेही वृत्त धडकले होते. मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यशस्वी शिष्टाई करत सत्तार यांच्या नाराजीवर पांघरूण घातले होते. दरम्यान, आज अब्दुल सत्तार हे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेण्याची शक्यता आहे.