Join us

‘त्या’ अबलेची ३३ तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:08 AM

अत्याचाराने महाराष्ट्र हादरलानराधम टेम्पोचालकाला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने ...

अत्याचाराने महाराष्ट्र हादरला

नराधम टेम्पोचालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना त्यावर कळस घडविणारी घटना महानगरातील पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडली. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षांच्या एका महिलेवर पाशवी बलात्कार करीत अमानुषपणे मारहाण करून तिची हत्या करण्याचा लज्जास्पद प्रकार घडला आहे. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने जबर जखमी झालेल्या अबलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे.

या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला असून, सर्वस्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविला जाऊन नराधमाला लवकरात लवकर कठोर शासन दिले जाण्याची ग्वाही दिली आहे, तर महिला सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

टेम्पो चालकाचे काम करणाऱ्या मोहन चौहानने एकट्याने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ व बहिणीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर त्यांनी या घटनेचे राजकारण न करता आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्यकर्त्यांनी केले आहे.

साकीनाका खैरानी रोडवरील येथील चांदिवली स्टुडिओच्या रशीद कम्पाउंडजवळ एक जण एका महिलेला एका टेम्पोमध्ये मारहाण करीत असल्याचे या परिसरातील पुठ्ठ्याच्या कारखान्यातील कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने शुक्रवारी पहाटे ३.२० वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर १० मिनिटांत साकीनाका पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे निरीक्षक ढुमे व पथक तेथे पोहोचले. एक महिला टेम्पोमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी तिला त्याच टेम्पोतून तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, खूप खोलवर जखमा झाल्या असल्याने शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी विविध पथके नेमून हल्लेखोराचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने त्याची ओळख पटवली. तो अन्य जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने पकडण्यात आले.