Join us  

"अभंगवारी' अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देते", षण्मुखानंदमध्ये घुमला विठूनामाचा गजर

By संजय घावरे | Published: July 15, 2024 7:57 PM

'अभंगवारी' अध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देते - महेश काळे

मुंबई : पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांची सध्या अभंगवारी सुरू आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधत सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या 'अभंगवारी' या मैफलीत विठूनामाचा गजर करत महेश यांनी उपस्थितांना जणू वारीतील आध्यात्मक वातावरणाची अनुभूती दिली. मागील बऱ्याच वर्षांपासून महेश काळे यांनी जागतिक व्यासपीठावर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या संगीत मैफलीत भक्ती, अध्यात्म आणि श्रद्धेचा अद्भुत संगम घडतो. हाच अनुभव नुकत्याच षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमातील श्रोत्यांनी घेतला. अभंगवारी या सांगीतिक मैफलीला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले पत्नी अनितासोबत उपस्थित होते. 

महेश काळे यांच्या पत्नी पूर्वा गुजर-काळेदेखील या कार्यक्रमाला हजर होत्या. सुबोध भावे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी महेश म्हणाले की, इकडे आम्ही अभंगवारी मैफलीला सुरुवात केली, तर तिकडे वारकऱ्यांची पंढरपूर यात्रा सुरू केली. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचणे हा त्यांचा हेतू असतो, तर तोच अनुभव अभंगवारीच्या माध्यमातून वारीला न जाऊ शकलेल्यांना देणे हे आमचे उद्दीष्ट आहे. वारीला न गेलेल्यांना अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव देणे हा आमच्या मैफलीतून मनापासून केलेला प्रयत्न आल्याचेही महेश म्हणाले. 

महेशसोबतच्या नात्याबद्दल हर्षा भोगले म्हणाले की, मी पहिल्यांदा माझ्या मेहुण्यांकडून महेश काळे यांच्याबद्दल ऐकले होते. मी त्यांचे गायन ऐकायला सुरुवात केली आणि हळूहळू आमचा परिचय होत गेला. माझी पत्नी आणि माझ्या सासूबाई महेश यांच्या गायनाच्या चाहत्या आहेत. मी एकदा काळे यांना विचारले की तुम्ही या दोघींना एक सरप्राईज देऊ शकाल का? तुम्ही त्यांच्यासाठी फोनच्या माध्यमातून गाणे म्हणाल का? हे ऐकताच महेश यांनी त्यांना फोन केला आणि दोघींसाठी गाणे म्हटल्याचेही हर्षा म्हणाले.

'अभंगवारी'च्या निमित्ताने मैफलीच्या संकल्पनेतून वारीतील वातावरण निर्मिती करण्यात आली. प्रत्येक प्रेक्षकाने कपाळाला टिळा लावून वारकऱ्यांप्रमाणे पांढरी टोपी घातली होती. या भक्तीमय वातावरणात रंगलेली अभंगवारी अतिशय स्मरणीय आणि अध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येकालाच एका वेगळ्या उंचीवर नेणारी ठरली. मुंबईनंतर पुणे, अक्कलकोट, चेन्नई, बंगलोर आणि हैद्राबाद येथेही अशीच मैफल रंगणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई