सीए परीक्षेत कोलकाताचा अभय, नोएडाचा सूर्यांश प्रथम; मुंबईचा धवल जुन्या अभ्यासक्रमात तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:16 AM2020-01-17T02:16:35+5:302020-01-17T02:16:43+5:30
आयसीएआय’च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये अकोल्याच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
मुंबई : नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सनदी लेखापाल परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कोलकाता येथील अभय बजोरिया, तर जुन्या अभ्यासक्रमात विजयवाडा येथील गुर्रम प्रणीत यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या धवल चोपडा याने जुन्या अभ्यासक्रमातून देशात तिसरे स्थान मिळविले. त्याला ८०० पैकी ५३१ म्हणजे ६६.३८ % गुण मिळाले आहेत. या परीक्षेत नव्या अभ्यासक्रमात (दोन्ही गट) १५.१२ टक्के विद्यार्थी तर जुन्या अभ्यासक्रमानुसार १०.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे आणि नोव्हेंबरमध्ये ही अंतिम परीक्षा आणि फाउंडेशन परीक्षा घेण्यात आली होती. यंदा नोव्हेबर २०१९ च्या परीक्षेत नव्या अभ्यासक्रमामध्ये ४३,७१७ विद्यार्थी; तर जुन्या अभ्यासक्रमासाठी ७२,९२१ विद्यार्थी बसले होते.
नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडाचा सूर्यांश अग्रवाल या दोघांनी ८०० पैकी ६०३ गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर कोलकात्याच्याच ध्रुव कोठारी याने ५७७ गुण मिळवत दुसरे स्थान मिळविले. जुन्या अभ्यासक्रमात विजयवाड्याच्या गुर्रम प्रणीतने ५७७ गुण मिळवीत पहिले स्थान तर मुंबईचा धवल चोपडा ५३१ गुण मिळवीत तिसरा आला आहे.
अकोला, नागपूर, नाशिकमधील विद्यार्थ्यांचीही बाजी
‘आयसीएआय’च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये अकोल्याच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. कृष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशात ३४ वा तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५०६ गुण घेत ४६ वा क्रमांक पटकावला आहे. सोबतच अकोल्यातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीएची पदवी प्राप्त केली आहे. नागपूरचा गौरव चांडक २५ वा आला आहे तर नाशिकचा कुशल लोढा याने ५६६ गुण घेत देशात पाचवा क्रमांक पटकाविला.
मित्रासोबत अभ्यास केला होता. मात्र देशात तिसऱ्या स्थानावर येईन, असे ध्यानीमनी नव्हते. निकाल जेव्हा कळला तेव्हा अनपेक्षित पण सुखद धक्का होता. सध्या माझा बिझनेस सुरू असल्याने एका बाजूला तो सुरू ठेवून दुसºया बाजूला मला आईसोबत लॉ फर्म सुरू करायची आहे. निश्चितच परीक्षेत देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावल्याने घरीही सर्वांना खूप अभिमान वाटत आहे. - धवल चोपडा, देशात तिसरा (जुना अभ्यासक्रम)