Join us  

"झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:16 PM

Slum Redevelopment : झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईतील मोठा तिढा सुटणार असून अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईतील मोठा तिढा सुटणार असून अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना २० ते २५ वर्षे रखडल्या आहेत. या योजनांचे अंतिम परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली हस्तांतरणे मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नाही. त्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला आहे. परिशिष्ट जाहीर झाल्यानंतर मधल्या काळात कौटुंबिक अडचणीमुळे अनेकांनी झोपड्या विकल्या त्यांच्या त्या नावावर होत नाहीत त्यामुळे योजनांवरही त्यांचा परिणाम झाला आहे. ही बाब मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्षात आणून देत मागील अधिवेशनासह याही अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर मुंबईचे सर्व पक्षीय आमदार एकवटले होते. त्यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अभय योजना जाहीर करण्याची घोषणा केली व अधिवेशन काळात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे घोषित केले होते.

आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह संबंधित अधिकारी व मुंबईतील आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक विधानभवनात झाली. या बैठकीत अभय योजनेच्या नियम, नियमावलीवर चर्चा करण्यात आली. तसेच आमदारांची मते जाणून घेण्यात आली आहेत.  सरकार याबाबत योजनेचा आराखडा तयार करीत असून ही योजना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आम्ही ज्या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत तो  मुंबईकरांचा एक विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. आज याबाबत तातडीने बैठक घेतल्याबद्दल  उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र सरकारआशीष शेलारदेवेंद्र फडणवीस