Join us

थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

म्हाडा वसाहत : थकीत सेवाशुल्काच्या वसूल योग्य रकमेवरील व्याज माफलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण ...

म्हाडा वसाहत : थकीत सेवाशुल्काच्या वसूल योग्य रकमेवरील व्याज माफ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : म्हाडाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था, रहिवाशांकडून थकीत सेवा शुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसूल करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अभय योजना सुरू करण्यात आली आहे.

अभय योजनेनुसार विविध योजनेतील गाळेधारकांकडून १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीची सुधारित दराने येणे असलेली रक्कम व प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम यांचे समायोजन करून ३१ मार्च २०२१ रोजी येणे असलेली उर्वरित रकमेची मागणी गाळेधारकांकडे केली जाईल. वसूल होण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून या थकीत सेवाशुल्काच्या वसूल योग्य रकमेवरील १ एप्रिल १९९८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीचे त्यावर होणारे व्याज माफ करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

थकीत सेवाशुल्काची वसूल रक्कम ५ वर्षात १० समान हप्त्यात वसूल करण्यासही मान्यता आहे. या वसूल रकमेचे पाच वर्षांत समान १० हप्त्यात वसुलीसाठी योग्य रकमेचे ८ टक्के वार्षिक व्याज दराने उन्नतीकरण करून दहा हप्ते पाडून गाळेधारकांकडून दर सहा महिन्याला स्वतंत्र बिलाद्वारे वसूल करण्यास मान्यता दिली आहे. जे गाळेधारक थकीत सेवाशुल्काची वसूल योग्य रक्कम प्रथम हप्त्यात एकरकमी भरण्यास तयार आहेत, त्यांना व्याजाचे ८ टक्के दराने उन्नतीकरण न करता थकीत सेवाशुल्काची सुधारित दराने देय मूळ रकमेच्या वसुलीस या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

-------------

- मुंबईत म्हाडाच्या ५६ हून अधिक वसाहती आहेत.

- म्हाडातर्फे या वसाहतींना सेवा पुरविल्या जातात.

- म्हाडा या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवाशुल्क वसूल करते.

- सेवाशुल्क आकारणीच्या बदल्यात म्हाडातर्फे पंप हाऊसची देखभाल, पंप चालकाचे वेतन, टँकर्सची आपत्कालीन दुरुस्ती, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य इत्यादींसारख्या सुविधा पुरविते.

-------------