MNS ( Marathi News ) : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचे नाव भाजपकडून चर्चेत असताना पानसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने पानसे मनसेचे की महायुतीचे उमेदवार असा पेच निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपने ही तडजोड केल्याची चर्चा आहे. दरम्यान, काल भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. आता मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अभिजीत पानसरे उमेदवारी अर्ज भरणार की मागे घेणार या चर्चा सुरू आहेत. यावर पानसे यांनी प्रतिक्रिया दिली.
"आमचा पक्ष हा आदेशावर चालतो, राज साहेबांनी एकदा सांगितलं की महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतो. आता राज साहेबांना तयारीची अपडेट देण्यासाठी आलो होतो. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे, संपूर्ण पक्षामध्ये सकारात्मक वातावरण आहे. गेली वर्षभर आम्ही नोंदणी करत आहोत, त्यामुळे आमचा विजय आम्ही निश्चित समजतो. आशिष शेलार यांच्यावर मी बोलण्याची योग्यता नाही ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि राज साहेब यांच्यात काही चर्चा झाली असेल मला माहित नाही. पण, एक नक्की आहे की ही निवडणूक भाजपा लढवेल किंवा शिवसेना लढवेल. आमची उमेदवारी आम्ही आधी जाहीर केली होती. आम्ही गेली वर्षभर यावर काम करत आहे, त्यामुळे आम्ही यावर ठाम आहे, असंही अभिजीत पानसे म्हणाले.
आम्ही ७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करणार
"पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा मोठा मतदारसंघ आहे. आमचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष कामाला लागले आहेत. पदवीधर आमदारांनी पदवीधरांची कामे करणे अपक्षित आहे, आताच्या आमदारांनी काय काम केलं तुम्हाला माहित आहे, असा टोलाही अभिजीत पानसरे यांनी लगावला. आम्ही तरुणांसाठी रोजगारनामा काढत आहे, कोकणपासून ते पालघरपर्यंत तरुणांसाठी अनेक योजना आमच्याकडे आहेत, असंही पानसरे म्हणाले. "भाजपा अर्जाबाबत काय करणार आहे माहित नाही. पण, आम्ही ७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करणार आहे, असंही अभिजीत पानसे म्हणाले.
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष रंगत असल्याचं दिसत आहे. कारण कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे निरंजन डावखरे हे गेली दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. असं असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.