अभिजित पवार यांना सेबीकडून 10 लाखांचा दंड, पूनावाला समूहासोबत झालेले कथित इन्सायडर ट्रेडिंग प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:57 AM2024-01-18T05:57:45+5:302024-01-18T10:54:18+5:30
या प्रकरणी सेबीने दिलेल्या निकालपत्रानुसार, पूनावाला समूहाने मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीमध्ये ३४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रेफरन्शिअल अलॉटमेंट सबस्क्रिप्शनद्वारे केली होती.
मुंबई : पूनावाला समूहातर्फे मॅग्मा फिनकॉर्प लि. (आताचे नाव पूनावाला फिनकॉर्प लि.) कंपनीत करण्यात आलेल्या आर्थिक गुंतवणुकीच्या माहितीच्या आधारे कथित इन्सायडर ट्रेडिंग प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने नफा कमावल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे व सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांना सेबीने १० लाखांचा दंड ठोठावला आहे. भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सविस्तर सुनावणीअंती सेबीने १६ जानेवारी २०२४ रोजी अंतिम निकाल दिला आहे.
या प्रकरणी सेबीने दिलेल्या निकालपत्रानुसार, पूनावाला समूहाने मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीमध्ये ३४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रेफरन्शिअल अलॉटमेंट सबस्क्रिप्शनद्वारे केली होती. मॅग्मा कंपनीची ताबेदारी मिळेल, इतकी या गुंतवणुकीची किंमत होती. मात्र ही माहिती ‘अनपब्लिशड् प्राइस सेन्सिटिव्ह इन्फर्मेशन’ अर्थात गोपनीय अशा स्वरूपाची माहिती होती. या व्यवहारात कार्यरत असलेल्या लोकांना ही माहिती ११ जानेवारी २०२१ रोजी मिळाली. नियमानुसार, ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा कालावधी ही माहिती गोपनीय ठेवण्याचा होता. ही माहिती १० फेब्रवारी रोजी सार्वजनिक करण्यात आली.
या कालावधीमध्ये पवार व भोजगढीया यांच्यात अनेक फोन कॉल्सदेखील झाल्याचे सेबीने नमूद केले आहे. हे प्रकरण फेब्रुवारी २०२१ मधील असून कंपनीच्या समभागांमध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याची माहिती सेबीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्या आधारे तपासणी व सुनावणी करत सेबीने या प्रकरणात निकाल दिला आहे.
नफ्याचे पैसे अभिजित पवार यांच्या मालकीच्या कंपनीच्या खात्यात सबस्क्राइब केले
मॅग्मा कंपनीत पूनावाला समूहातर्फे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीची माहिती मिळाल्यानंतर अभिजित पवार यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीतर्फे भोजगढीया यांना तसेच त्यांच्या एचयूएफ (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली) कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते. हे पैसे आपण कर्जरूपाने दिल्याचा दावा पवार यांनी सेबीपुढे केला होता. मात्र, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ पवार यांनी समाधानकारक पुरावे दिले नसल्याचे सांगत सेबीने पवारांचा हा मुद्दा फेटाळला आहे. हे पैसे त्यांनी या व्यवहाराच्या गोपनीय कालाववधीत दिल्याचा ठपका असून याच पैशांद्वारे भोजगढीया यांनी मॅग्मा कंपनीच्या समभागांत व्यवहार केल्याचे सेबीने नमूद केले आहे. याद्वारे ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा त्यांनी कमावला. नफ्याचे हे पैसे भोजगढीया यांनी अभिजित पवार यांच्या मालकीच्या डीसीएफ बीएफआर कन्सल्टिंग प्रा. लि. या कंपनीच्या खात्यात प्रेफरन्शिअल शेअर सबस्क्राइब केल्याचे दाखवत हस्तांतरित केल्याचे दिसून आले.