अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना घेतले ताब्यात, कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:14 AM2024-02-09T09:14:35+5:302024-02-09T09:18:00+5:30
Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करताना दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला स्वयंघोषित समाजसेवक मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेकडून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करताना दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू यांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख झाला होता. आता ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सररकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री याबाबत चर्चा केली. तसेच या घटनेमागचं नेमकं कारण काय याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे.
दरम्यान, मॉरिस आणि अभिषेक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद होते. ते नुकतेच मिटल्याचा दावा केला जात होता. मॉरिस याने गुरुवारी कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर तेथे पोहोचताच त्यांनी गळाभेट घेतली. दोघे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष होता. साडेसातच्या सुमारास आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. दोघांनी एकमेकांमधील गैरसमज दूर करून एकत्र आल्याचे सांगितले. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.