घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:00 AM2024-09-24T07:00:48+5:302024-09-24T07:00:53+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असून, सीबीआयने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. 

Abhishek Ghosalkar murder case will now be investigated by CBI instead of Mumbai Police | घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

मुंबई : उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास आता मुंबई पोलिसांऐवजी सीबीआय करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले असून, सीबीआयने याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. 

८ फेब्रुवारी राेजी अभिषेक घोसाळकर मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमाचे नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह केले होते. हे फेसबुक लाइव्ह संपतेवेळी त्याने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. त्यानंतर लगेच त्यानेदेखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. यानंतर सर्वप्रथम  बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेकडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला होता. 

आयपीएस अधिकारी करणार तपास

गुन्हे शाखा आपल्या पतीचा तपास व्यवस्थित करत नाही, तसेच या हत्येमागील विविध शक्यता देखील विचारात घेत नसल्याचा आरोप करत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागत हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास करावा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार, याप्रकरणी एफआयआर दाखल करत एका आयपीएस अधिकाऱ्याकडे हा तपास सोपवला आहे.
 

Web Title: Abhishek Ghosalkar murder case will now be investigated by CBI instead of Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.