'अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी; चित्रा वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 04:29 PM2024-02-09T16:29:21+5:302024-02-09T16:39:56+5:30
काल मुंबईतील दहीसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली.
Chitra Wagh ( Marathi News ) : मुंबई- काल मुंबईतील दहीसर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. मॉरिस नोरोन्हा या व्यक्तीने हा गोळीबार केली आणि स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केले आहेत. दरम्यान, आता आरोपाला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला
'भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करुन ठाकरे गटावर टीका केली आहे."स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय, असं वाघ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"मॅारिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे चांगले संबंध होते. 2024 ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोघेजण एकत्र होते. ते दोघेही सोबत काम करत होते. मग घोसाळकरांसोबत स्वतःचाही जीव घेणाऱ्या मॉरिस नरोन्हाकडून कुठल्या गोष्टीवरून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र पिस्तुल कुठून आलं, लायसन्स मिळालं आहे का? या सर्व गोष्टी तपासून कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी दिलंय. पण, सर्वज्ञानी संजय राऊत आणि उबाठा गटाचे नेते हीन राजकारण करून आणि पराकोटीची गलिच्छ भाषा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.
"तत्कालीन उबाठा सरकारची लक्तरेही आम्हाला वेशीवर मांडता येतील. त्यांच्या वसुलीबहाद्दर गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करता येईल. पण, ही ती वेळ नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 'राज्याची कायदा-सुव्यवस्था देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पोलीस चोखपणे सांभाळताहेत, म्हणून तर मोहोळ प्रकरणातील आरोपी ताबडतोब गजाआड झाले. परवाच पुण्यात सर्व गुंडांची झाडाझडती घेऊन त्यांना कठोर समज देण्यात आलीय. कायदा हातात घेणाऱ्या स्वपक्षाच्या आमदारालाही त्यांनी तुरूंगाचे दरवाजे दाखवलेत. त्याच निःपक्षपाती भूमिकेतून घोसाळकर प्रकरणाचाही तपास होईल आणि सत्य जनतेसमोर येईल, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
"स्वतःच्याच पक्षाच्या एका होतकरू तरूणाच्या मृत्यूचे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राऊत आणि उबाठा गँगला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.
स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांना भावपुर्ण श्रद्धांजली….🙏
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 9, 2024
स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून… pic.twitter.com/CvMTn8vrpO