अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्वनियोजित ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 07:02 AM2024-02-09T07:02:40+5:302024-02-09T07:03:01+5:30
अभिषेक कार्यक्रमाला पत्नीसोबत पोहोचले. चिमुकल्यांसोबत फोटोशूट केले. त्यांच्या हस्ते नागरिकांना फळ, साड्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद लुटला. मॉरिसने ...
अभिषेक कार्यक्रमाला पत्नीसोबत पोहोचले. चिमुकल्यांसोबत फोटोशूट केले. त्यांच्या हस्ते नागरिकांना फळ, साड्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद लुटला. मॉरिसने त्यांना विश्वासात घेत कार्यालयात फेसबुक लाइव्हसाठी नेले. अवघ्या चार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हनंतर त्यांची गोळी झाडून हत्या केली. या व्हिडीओदरम्यान मॉरिस दोन ते तीन वेळा उठून बाजूला जातो. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, तपास सुरू आहे. बोरिवलीत घोसाळकर यांचे राजकीय वर्चस्व होते. ते कमी करण्यासाठी हत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा असलेले अभिषेक दोन वेळा दहिसर कांदरपाडा ७ येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई बँकेच्या संचालकपदीही ते कार्यरत होते.
अत्याचाराचा गुन्हा
मॉरिसविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता. लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्यामागे अभिषेकचा हात असल्याचा संशय मॉरिसला होता. त्या रागातून हा प्रकार घडल्याचेही बोलले जाते. काही दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आम्ही घटनास्थळाचा पंचनामा करत, तज्ज्ञांच्या मदतीने अधिक तपास करत आहोत.
- राज तिलक रौशन, पोलिस उपायुक्त, गुन्हे