अबिस रिझवी इस्तंबूलमध्ये ठार
By Admin | Published: January 2, 2017 06:08 AM2017-01-02T06:08:20+5:302017-01-02T06:08:20+5:30
मुंबईतील प्रसिद्ध रिझवी बिल्डरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिनेनिर्माता अबिस रिझवी (४९) यांचा इस्तंबूल येथील नाइट क्लबमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीत
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध रिझवी बिल्डरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिनेनिर्माता अबिस रिझवी (४९) यांचा इस्तंबूल येथील नाइट क्लबमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राज्यसभेचे माजी खासदार अख्तर हसन रिझवी हे अबिस यांचे वडील आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध रिझवी बिल्डरचे अबिस हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रिझवी बिल्डर्स मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. मुंबई आणि गोव्यात त्यांचे २००हून अधिक व्यावसायिक व गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यांनी अलीकडेच चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केले होते. ‘रोअर: टायगर्स आॅफ द सुंदरबन’ या हिंदी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी अबिस रिझवी काही दिवसांपूर्वी इस्तंबूलला गेले होते. दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांंनी रिझवी परिवाराला या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्याचे समजते.
अबिस रिझवी यांच्यामागे मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. अबिस यांचा मृत्यू रिझवी कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. त्यांचा लहान भाऊ साकीब याचे २0१0 साली कर्करोगाने निधन झाले होते. अबिस यांच्या मृत्यूची माहिती कळताच अबिसचे वडील अख्तर हसन रिझवी तुर्कस्तानकडे रवाना झाले.
अबिसचे वडील अख्तर रिझवी हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस पक्षात प्रवेश केला होता. (प्रतिनिधी)