मुंबई : अश्लील चित्रफिती बनवल्याप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या शिल्पा शेट्टीने अखेर तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. एका लेखाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर करीत तिने आपल्या मनातल्या अबोल भावना व्यक्त केल्या.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून गुरुवारी रात्री लेखक जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील एका लेखाचा फोटो शेअर केला. त्याखाली कोणताही संदेश लिहिला नसला तरी तिला नक्की काय म्हणायचे आहे, याचा अर्थबोध लेखातील मजकुरावरून होतो. लेखात म्हटले आहे की, ‘रागाच्या भरात मागे वळू नका किंवा घाबरून पुढेही पाहू नका. जागरुक होऊन फक्त सभोवताली बघत राहा. आपण रागात त्या लोकांना मागे पाहतो ज्यांनी आपल्याला सर्वांत जास्त दुःख दिलेले असते. नोकरी तर जाणार नाही ना, या भीतीने आपण घाबरतच पुढे पाहत असतो. आपल्याला वाटणारी भीती ही जवळच्या लोकांना गमावण्याची किंवा आजारपणाचीही असू शकते. आपण वर्तमानामध्ये जगायला शिकले पाहिजे. काय घडले, पुढे काय घडणार, याबद्दल विचार करत बसण्याऐवजी वास्तवात जगायला शिकले पाहिजे’, असे शिल्पाने शेअर केलेल्या लेखात म्हटले आहे.
‘जेथे असायला हवे तेथे आपण आहोत. काय झाले होते आणि काय होणार आहे, याचा विचार करत बसू नका. फक्त जागरूक रहा. मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजून एक दीर्घ श्वास घेते आणि विचार करते की मी भाग्यवान असल्यामुळेच हे आयुष्य जगण्याची संधी मला मिळाली. मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना सामोरी गेलेली आहे आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांनाही सामोरे जाणार आहे. माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही,’ असे विचारही या लेखात मांडण्यात आले आहेत.
या कात्रणाच्या खाली शिल्पाने कोणताही संदेश लिहिला नसला तरी, त्यातील आशयातून तिला नक्की काय म्हणायचे आहे याचा बोध होतो. या लेखातील भावना शिल्पाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. यानिमित्ताने तिने आपल्या अबोल भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भविष्यकालीन संकटाला तोंड तयार असल्याचे तिने या माध्यमातून स्पष्ट केले आहे.