ग्रेस मार्क रद्द करा, सुधारित निकाल लावा, ‘नीट’च्या सदोष निकालावरून राज्याची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:17 AM2024-06-11T08:17:00+5:302024-06-11T08:17:43+5:30

NEET Exam: नीट-यूजीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करा व सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल लावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे (ओएमआर शीट्स) फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली.

Abolish Grace Mark, Revised Result, State's Demand to Center over 'NEET' Faulty Result | ग्रेस मार्क रद्द करा, सुधारित निकाल लावा, ‘नीट’च्या सदोष निकालावरून राज्याची केंद्राकडे मागणी

ग्रेस मार्क रद्द करा, सुधारित निकाल लावा, ‘नीट’च्या सदोष निकालावरून राज्याची केंद्राकडे मागणी

मुंबई  - नीट-यूजीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करा व सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल लावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे (ओएमआर शीट्स) फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाला पत्र पाठवून केली आहे. नीट-यूजीचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाही (एनटीए) पत्र लिहून विद्यार्थी-पालकांच्या शंकांचे निरसन तातडीने करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थी-पालकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. 

राज्याच्या पत्रात काय?
- नीट-यूजीच्या माहितीपत्रकात कुठेही वेळ कमी पडल्याने ग्रेस मार्क देण्याचा मुद्दा समाविष्ट नव्हता. तरीही दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना एनटीएने ग्रेस मार्क दिले आहेत.
- एनटीएने जाहीर केलेले ओएमआर शीट आणि गुण स्कोर कार्डशी जुळत नाहीत. ग्रेस मार्कांमुळे ऑल इंडिया रँकमध्ये अनैसर्गिक वाढ झाली आहे.

औरंगाबाद खंडपीठात १८ जूनला सुनावणी
छत्रपती संभाजीनगर : नीट परीक्षेतील गैरप्रकाराची चाैकशी करावी, ज्या केंद्रातून प्रश्नपत्रिका बाहेर पसरली तेथे पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साेमवारी सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर १८ जून राेजी न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठात सुनावणी हाेणार आहे. 

संशय आणि तक्रार काय? 
नीटच्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले. त्यातील ८ विद्यार्थी हरियाणातील एकाच केंद्रावरचे आहेत. गतवर्षी केवळ एकाच विद्यार्थ्याला ७२० गुण मिळाले होते. यावर्षी १,५६३ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले. 
गुणवत्ता यादीतील ६८ आणि ६९ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ७१९ व ७१८ गुण मिळाले. परंतु, नियमानुसार ७१८ व ७१९ गुण मिळणे अशक्य आहे. कारण निगेटिव्ह गुण पद्धतीमुळे एका प्रश्नाचे उत्तर चुकले तर ५ गुण कपात होतात. ज्या केंद्रावर परीक्षा उशिरा सुरू झाल्या, तेथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दर मिनिटाला अतिरिक्त गुण देण्यात आले. 

Web Title: Abolish Grace Mark, Revised Result, State's Demand to Center over 'NEET' Faulty Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.