सेवानिवृत्ती वयवाढीचे परिपत्रक रद्द करा! पालिकेतील अध्यापकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2023 10:03 AM2023-03-04T10:03:37+5:302023-03-04T10:04:03+5:30
पत्रात त्यांनी महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची अध्यापकांची कमतरता नसल्याचा मुद्दा सविस्तरपणे मांडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील अध्यापकांचे सेवानिवृत्तांचे वय ६२ वरून ६४ करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात पालिका वैद्यकीय शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी आयुक्तांना भेटून सेवानिवृत्ती वयवाढीचे परिपत्रक रद्द करा, अशी मागणी असलेले पत्र त्यांना दिले.
पत्रात त्यांनी महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची अध्यापकांची कमतरता नसल्याचा मुद्दा सविस्तरपणे मांडला आहे. ‘लोकमत’ने बुधवारी ‘मेडिकलच्या प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविले’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनांचे सरचिटणीस डॉ. रवींद्र देवकर यांच्या नेतृत्वात पाच महाविद्यालयांतील अध्यापक आयुक्तांना भेटले. काही महिन्यांपूर्वीच आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक तपासणी करून गेले, त्यामध्ये सर्व ठिकाणी पुरेसे शिक्षक असल्याचे नमूद केले आहे. तसेच कालबद्ध पदोन्नती केल्यास सर्व काम सोयीस्कर होईल. इत्यादी मुद्दे पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
शिष्टमंडळातील एका प्राध्यापकाने सांगितले की, महापालिका आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांनी आमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी या विषयाचा पुन्हा एकदा अभ्यास करू आणि काय करता येईल पाहू, असे आश्वासन दिले. आम्ही सर्वजण सेवानिवृत्ती वयात वाढ करू नये, या मताचे असल्याचे आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे.
महापालिकेची महाविद्यालये
n टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (नायर रुग्णालय)
n सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (केईएम रुग्णालय)
n लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज (सायन रुग्णालय)
n हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज (कूपर रुग्णालय)
n नायर डेंटल कॉलेज