Join us

जंगलाच्या संवर्धनासाठी एकवटले आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:50 AM

‘जागतिक जैवविविधता दिना’चे निमित्त; ‘आरे महोत्सवा’चे आयोजन

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये अलीकडे विविध प्रस्तावित प्रकल्पांमुळे आरेतील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे ‘जागतिक जैवविविधता दिना’निमित्त आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकाजवळील पिकनिक उद्यानात रविवारी ‘आरे महोत्सव २०१९’चे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा चौकातील बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून, तसेच वाघोबा देवाची पूजा करून आरे महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी वृक्षतोडीस विरोध व जंगल संवर्धनासाठी मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव एकवटले होते. एकदिवसीय महोत्सवात तारफा नृत्य, गौरी नृत्य, कामडी नृत्य, तूर नृत्य आणि चवळी नृत्य अशा विविध नृत्याविष्कारातून निसर्गाच्या विविध छटा दाखविण्यात आल्या. निसर्गाचे स्नेहसंबंध जपण्याच्या दृष्टिकोनातून या महोत्सवाला विशेष महत्त्व होते. मानवासह निसर्गातील सर्व सजीव समान आहेत. त्यामुळे निसर्ग-मानव यांचे नाते समोर ठेवून हा जागतिक जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला, अशी माहिती आदिवासी बांधवांनी दिली. दरम्यान, श्रमिक आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच, कष्टकरी शेतकरी संघटना आणि आम आदमी पार्टी यांच्या पुढाकाराने आरे महोत्सव यशस्वी झाला.