घरातच केला अविवाहित बहिणीचा गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:43+5:302020-12-11T04:24:43+5:30
अर्भकाची विल्हेवाट लावणारी महिला अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई घरातच केला अविवाहित बहिणीचा गर्भपात बदनामीची भीती : अर्भकाची विल्हेवाट लावणाऱ्या ...
अर्भकाची विल्हेवाट लावणारी महिला अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई
घरातच केला अविवाहित बहिणीचा गर्भपात
बदनामीची भीती : अर्भकाची विल्हेवाट लावणाऱ्या महिलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बदनामीच्या भीतीने अविवाहित बहिणीचा घरातच गर्भपात करून अर्भकाची विल्हेवाट लावणाऱ्या २९ वर्षीय महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध सुरू असताना, त्याच कपड्यांमध्ये संशयित महिला फिरताना दिसताच तिला अटक करण्यात आली.
कांदिवली पूर्वेकडील सिंग इस्टेट परिसरातील डम्पिंग ग्राउंड परिसरात २९ नोव्हेंबर रोजी ५ ते ६ महिन्यांचे अर्भक सापडले हाेते. या प्रकरणी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करत पोलिसांनी तसेच गुन्हे शाखेच्या कक्ष १२ नेही याचा समांतर तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. एका फुटेजमध्ये महिलेच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत पडल्या. तोच धागा पकडून गुन्हे शाखेने पुढील तपास हाती घेतला.
डम्पिंग ग्राउंड परिसरात एक पथक नजर ठेवून होते. त्याचदरम्यान घटनेच्या दिवशी घातलेले कपडे घालून ती महिला पुन्हा त्या भागात आल्याचे दिसून आले. त्यानुसार महिलेला ताब्यात घेऊन पाेलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तिने ते अर्भक बहिणीचे असल्याचे सांगितले. बहीण अविवाहित असल्याने तिची बदनामी झाली असती, म्हणून गोळ्या देऊन गर्भपात केला आणि अर्भक डम्पिंग ग्राउंडवर फेकल्याचे तिने सांगितले. बहिणीची प्रकृती ठीक नसल्याने तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी समतानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
........................