फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:02 AM2024-03-18T10:02:36+5:302024-03-18T10:04:17+5:30
एक लाख ५५ हजार प्रवाशांना विलंबाचा फटका.
मुंबई : नुकत्याच सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात देशात एक कोटी २६ लाख ४० हजार नागरिकांनी विमान प्रवास केला. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. नवीन वर्षात जानेवारी व फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत मिळून एकूण २ कोटी २७ लाख ७० हजार लोकांनी विमान प्रवास केला आहे.
डिसेंबर महिन्यापासून देशातील विमान सेवेत मोठ्या प्रमाणावर विलंब होण्याच्या घटना घडल्या आहेत. विमान सेवेला विलंब झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात तब्बल एक लाख ५५ हजार ३८७ प्रवाशांना याचा फटका बसला आहे. विमान प्रवासाला विलंबामुळे विमान कंपन्यांना या प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी २२ लाखांचा खर्च करावा लागला आहे, तर यापैकी २९,१४३ प्रवाशांचे विमानच रद्द झाल्यामुळे त्यांनादेखील भरपाईपोटी ९९ लाख ९६ हजार रुपये विमान कंपन्यांनी दिले आहेत.
कंपन्यांविरोधात ७९१ तक्रारी ः
विमान प्रवासादरम्यान गैरसोय होणे, सामान हरवणे, उशिरा पोहोचणे, सामानाची मोडतोड होणे, तिकिटांचा परतावा वेळेत न मिळणे, ग्राहक सेवेत त्रुटी राहणे अशा एकूण ७९१ तक्रारी फेब्रुवारी महिन्यात विमान प्रवाशांनी दाखल केल्या आहेत.
६०% विमान सेवेमध्ये फेब्रुवारी महिन्यातदेखील इंडिगो कंपनीने आपला अव्वल क्रमांक कायम राखला असून, कंपनीने ६० टक्क्यांचा हिस्सा गाठला आहे.
‘इंडिगो’चा अव्वल क्रमांक कायम -
१) एअर इंडिया कंपनीच्या हिश्श्यात वाढ झाली असून, कंपनीचा हिस्सा आता १२.२ टक्के इतका झाला आहे.
२) स्पाईस जेट कंपनीचा हिस्सा ५.६ टक्क्यांवरून कमी होत ५.२ टक्के झाला आहे.
३) विस्तारा व अकासा एअर कंपन्यांचा हिस्सा अनुक्रमे ९.९ टक्के व ४.५ टक्का इतका राहिला आहे.