मुंबई : परराज्यांतील स्वस्त विदेशी दारूची अहमदाबाद-मुंबई महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचे ७२३ बॉक्स, असा १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र यांना अहमदाबाद-मुंबई महामार्गावर टाटा कंपनीच्या सहाचाकी ट्रकमधून दादर-नगर हवेली व दीव दमन राज्यांतील विक्रीकरिता असलेली विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून भरारी पथकाने टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना वाहनांमध्ये विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे ५१२ बॉक्स, असा एकूण ६५ लाख ५४ हजार १६० किमतीचा मुद्देमाल हाती लागला. आयशर कंपनीच्या ट्रकमध्ये विक्रीसाठी आणलेले दारूचे २११ बॉक्स, असा ३९ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र निरीक्षक विजयकुमार थोरात, निरीक्षक रियाज खान तसेच दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते. स. दु. नि. रवींद्र पाटील, जवान बाबा बोडरे, संतोष शिवापूरकर, शाहरुख तडवी, अविनाश जाधव, दीपक कळंबे यांच्या सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक थोरात आणि खान करीत आहेत.
दोन आरोपींना अटक :
या दोन्ही गुन्ह्यांत भरारी पथकाने कारवाई करत चालक रमजान शेख याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच राजतोमर सिंग आणि डेनी सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे.
या कारवाईत दोन ट्रक तसेच विदेशी मद्याचे एकूण ७२३ बॉक्स, असा १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.