मुंबई : बोरिवलीत आयोजित केलेल्या ‘रंगताली २०२३ नवरात्रोत्सवा’च्या आयोजकांची पेटीएम इन्सायडर कंपनीने ९९.९९ लाखांची फसवणूक करत ४२५ तिकिटांचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार दिल्यावर या कंपनीचे मुंबई ब्रँचप्रमुख करण अरोरा आणि त्याची सहकारी रिद्धी लधानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार करणकुमार दोशी हे इव्हेंट मॅनेजर असून, ते यश एंटरटेनमेंट सोबत काम करतात. बोरिवलीतील जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, न्यू एमएचबी कॉलनीत या कंपनीने राज सुर्वे यांच्या तारामती फाउंडेशनसोबत मिळून १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ‘रंगताली २०२३’ या नवरात्रोत्सवाचे आयोजन केले. कार्यक्रमात प्रसिद्ध गुजराती गायिका ऐश्वर्या मुजुमदार गाणार होत्या. यश एंटरटेनमेंटने या कार्यक्रमाच्या तिकीट बुकिंगसाठी ‘पेटीएम इनसाइडर’ची निवड केली. त्यावेळी ७ ते १० कोटींची कमाई होईल, असे त्यांनी सांगितले.
यश एंटरटेनमेंटने त्यांना ६ कोटी ४५ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीच्या तिकीट विक्रीचे टार्गेट दिले होते. त्यावेळी टार्गेट पूर्ण न झाल्यास आम्ही दोन कोटी रुपये तुम्हाला देऊ, तसेच मोठी प्रायोजकत्वाची रक्कम देण्याचे ‘पेटीएम इन्सायडर’ने आमिष दाखवले. पाच टक्के ऑनलाइन, तर तीन टक्के ऑफलाइन कमिशनची मागणीही केली. अरोराच्या कंपनीने २९ सप्टेंबर, २०२३ पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग घ्यायला सुरुवात केली. मात्र, अचानक ‘पेटीएम इन्सायडर’ने बुकिंग करणे , बंद करत यश एंटरटेनमेंटला मेल करत पूर्वी ठरलेल्या अटींमध्ये बदल करून नंतर पुढे बुकिंग करू, अशी विनंती केली. मात्र, करारात बदल करण्यास यश इंटरटेनमेंटने विरोध केला.
कराराचे उल्लंघन-
१) अरोराच्या कंपनीने नवरात्रातील ६, ८, ९ आणि १० या दिवशीच्या ४२५ तिकिटांची विक्री केली. मात्र त्याची माहिती यश एंटरटेन्मेंटला दिली नाही. तिकिटांचे पैसे मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच करारही पाळला नाही.
२) ‘पेटीएम इन्सायडर’ने ४२५ तिकिटांचे पैसे दिले नाहीत, तसेच सीझन पास व प्री बुकिंग तिकीट विक्री करून त्यातून जमा झालेले ९९ लाख ९९ हजार रुपयेही स्वतःकडेच ठेवून यश एंटरटेन्मेंटचे नुकसान केले.
३) याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अरोरा आणि लधानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.