Join us

नवीन वीजजोडण्यांसाठी ऑनलाइनद्वारे दोन महिन्यांत सुमारे १ लाख ७ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 6:08 PM

शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाइनद्वारेच करावे, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला

मुंबई- शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाइनद्वारेच करावे, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून मागील दोन महिन्यांत सुमारे १ लाख ७ हजार ३४८ ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केले असून, त्यांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.नवीन ग्राहकांना पारदर्शकपणे व त्वरित वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणने मोबाईल ॲप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाइनद्वारेच करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ग्राहकांना ऑनलइनद्वारे अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोडवून ऑनलाइनद्वारेच अर्ज करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ या दोन महिन्यांत महावितरणच्या संकेतस्थळावर ९३ हजार ९० ग्राहकांचे तर मोबाईल ॲपद्वारे १४ हजार २५८ ग्राहकांचे नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय ऑनलाइन संबंधित विविध स्त्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे २ लाख २४ हजार २४२ नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइनद्वारे अर्ज करण्याची सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाइन सुविधेचाच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.