१० लाख ४० हजार भारतीयांना मिळाला अमेरिकेचा व्हीसा; २०२३ मध्ये रचला नवा विक्रम
By मनोज गडनीस | Published: January 30, 2024 05:28 PM2024-01-30T17:28:44+5:302024-01-30T17:29:52+5:30
देशभरातील अँम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हीसा देत नवा विक्रम रचला आहे
मनोज गडनीस, मुंबई : नुकत्याच सरलेल्या २०२३ या वर्षामध्ये अमेरिकेच्या देशभरातील अँम्बसी व कौन्सुलेट कार्यालयांनी १० लाख ४० हजार भारतीयांना अमेरिकेचा व्हीसा देत नवा विक्रम रचला आहे. तसेच, व्हीसाच्या प्रतीक्षा कालावधीमधील विलंब देखील कमी केल्याची माहिती अँम्बसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यानुसार, गेल्यावर्षी अमेरिकी व्हीसाच्या सर्वच श्रेणीतील व्हीसाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या वर्षात व्हीसासाठी ६० टक्के अधिक अर्ज दाखल झाले होते. या विक्रमी व्हीसासंख्येमुळे अमेरिकेसाठी देण्यात येणाऱ्या प्रत्येक दहा व्हीसामध्ये एका भारतीय व्हीसाचा समावेश आहे. २०२३ च्या वर्षामध्ये जारी करण्यात आलेल्या व्हीसामध्ये ७ लाख लोकांना बी१-बी२ श्रेणीतील व्हीसा मंजूर करण्यात आला आहे. तर अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना व्हीसा जारी करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या अमेरिकेच्या व्हीसामध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदली गेली आहे. अमरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या अन्य देशांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या विक्रमी आहे. याखेरीज नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या लोकांना व कुटुंबीयांना मिळूण एकूण ३ लाख ८० हजार व्हीसा जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, कोव्हीड काळामध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व अन्य बंधनांमुळे व्हीसा जारी करण्याच्या कालावधीमध्ये वाढ झाली होती. हा कालावधी आता एक हजार दिवसांपासून २५० दिवस इतका खाली आला आहे.