Join us  

१० कोटी नागरिकांचा २६ महिन्यांत मेट्रो प्रवास; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर २३ गाड्यांद्वारे सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:11 AM

डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेने १० कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला.

मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेने १० कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला. तब्बल दोन वर्ष आणि दोन महिन्यांच्या कालावधीत या मेट्रो मार्गिकेने ही कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत दोन्ही मेट्रो मार्गिकांवर दरदिवशी सुमारे २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेचा डहाणूकरवाडी ते आरे हा पहिला टप्पा २ एप्रिल २०२० रोजी सुरू झाला. त्यावेळी मेट्रो मार्गिकेला अंधेरी येथील मेट्रो १ मार्गिकेची जोडणी नसल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यातून पहिल्या आठ महिन्यांत या मेट्रो मार्गिकेवरून केवळ ८९ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, या मेट्रोचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२३ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर या मार्गिकेवरून २० जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान ७ कोटी १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. आता तीन महिने आणि आठ दिवसांत यात आणखी दोन कोटी प्रवाशांची भर पडल्याची माहिती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गिकेवर २३ मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जात असून, गर्दीच्या वेळी दर साडेसात मिनिटांनी एक गाडी धावत आहे.

दरदिवशीची प्रवासी संख्या २ लाख ४० हजार-

१)  या मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरून दरदिवशी ४.०७ लाख प्रवासी प्रवास करतील, तर ‘मेट्रो ७’ वरून दरदिवशी ५.२८ लाख प्रवासी करतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने केला होता. 

२) मात्र, दोन वर्ष उलटूनही अद्याप प्रवासी संख्या गाठता आली नसल्याची स्थिती आहे. आता मंडाले ते डी. एन. नगर ‘मेट्रो २ बी’ मार्गिका सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. 

३) मात्र, ही मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीएअंधेरीदहिसर