Join us

१० हजार कर्मचारी, शिक्षक लागले निवडणुकीच्या कामाला; विद्यार्थ्यांनी धडे गिरवायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:27 AM

मुंबई महापालिका अधिकारी - कर्मचारी आणि पालिका शाळांचे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नेमले आहेत. त्यामुळे या सर्वांवर अतिरिक्त ताण येत आहे.

सीमा महांगडे, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १० हजार ४०० इतके मुंबई महापालिका अधिकारी - कर्मचारी आणि पालिका शाळांचे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नेमले आहेत. त्यामुळे या सर्वांवर अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय पालिकेतील विविध विभागांतील कामेही खोळंबल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग कार्यालयांतून तसेच विविध खात्यांतून १० हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकारी लोकसभा निवडणूक कामासाठी उपलब्ध करून दिले आहेत. महापालिका चिटणीस खाते, मुख्य लेखापरीक्षक, आयुक्त कार्यालय, प्रमुख लेखापाल, प्रमुख सुरक्षा अधिकारी, प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख कामगार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, प्रमुख अग्निशमन अधिकारी, घनकचरा व्यवस्थापनातील प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:स्सारण प्रचालन आणि प्रकल्प, रस्ते आणि वाहतूक या विभागांतील प्रमुख अभियंते, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अधिकारी, मालमत्ता विभाग यांचा समावेश आहे. महापालिकेच्या ‘क’ संवर्गातील विविध विभागांतील साडेसात हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मतदान केंद्रस्तरीय अधिकारीपदाचे कामकाज सोपवले आहे. 

लोकसभेच्या कामकाजाच्या स्वरुपामुळे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टीही मिळणे कठीण झाले आहे.   त्यांचा ताण कमी करण्यासाठी साप्ताहिक सुट्टी मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, मुंबई शहर, उपनगर निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. - रमाकांत बने, सरचिटणीस, दी म्युनिसिपल युनियन

गाडा कसा हाकणार?

पालिकेत ९० हजार कर्मचारी आहेत. १० हजार कर्मचारी निवडणूक कामांसाठी गेल्यास ४० ते ४५ हजार कर्मचारी राहतात. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांकडून पालिकेचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकालोकसभा निवडणूक २०२४शिक्षक