मुंबई : पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही फ्लडिंग पॉइंटची नव्याने निर्मिती पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईत ठिकठिकाणी ३८६ (पूरप्रवण क्षेत्र) फ्लडिंग पॉइंट आढळताच पालिकेने तातडीने उपाययोजना केल्या. त्यामुळे ३८६ ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी नव्याने १०१ पूरप्रवण क्षेत्रांची निर्मिती झाल्याने पावसाळ्यापूर्वी हे भाग पूरमुक्त करणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करावा लागू नये त्याकरता करण्यात येणाऱ्या कामांसाठी अर्थसंकल्पात १,९३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई सात बेटांवर वसलेले आहे. त्यामुळे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. पाण्याचा निचरा होण्यास अनेक अडचणी येत असल्याने रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी जमा होते. यावर तोडगा म्हणून २००६ पासून ‘ब्रिमस्ट्रोवॅड’ उपक्रमांतर्गत पालिकेच्या माध्यमातून पाणी तुंबण्याचे प्रमाण, ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
असे होणार काम ?
३८६ पूरप्रवण क्षेत्रांपैकी ३२६ ठिकाणी पालिकेने पूरमुक्तीचे आवश्यक काम केले आहे.
नव्याने आढळलेल्या एकूण १०१ ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज.
पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने ७२ ठिकाणी पूरनियंत्रणाची कामे करण्यात येणार.
१० कामे नियोजित स्तरावर. शासकीय, खासगी मालमत्तेमधील १६ ठिकाणी काम आवश्यक.
वॉटर लेव्हल इंडिकेटर :
पाणी साचून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे ‘वॉटर लेव्हल इंडिकेटर’ बसवण्यात येणार आहेत. पाणी तुंबणाऱ्या सखल ठिकाणी ३९६ पोर्टेबल उदंचन संच. ११२ ठिकाणी अतिरिक्त उदंचन संचाची पालिकेकडून व्यवस्था करण्यात येणार आहे.
येथे पम्पिंग :
पालिकेने आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड आणि जुहू या ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला हजारो लिटर पाणी उचलून समुद्रात फेकले जात असल्याने पाणी तुंबण्याची समस्या कमी होत आहे.
पाणी तुंबणारी नवी ठिकाणे :
आता कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी व्यापक प्रमाणात नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
तर हिंदमाता, मीलन सबवे याठिकाणी भूमिगत टाक्यांच्या प्रयोगामुळे संबंधित परिसरात पाणी तुंबण्याची समस्या कमी झाली आहे.
तर सर्व सबवेच्या ठिकाणीही भूमिगत टाक्यांचा प्रयोग केला जात असल्याने पाणी तुंबण्याची समस्या कमी होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; मात्र पाणी तुंबणारी नवी ठिकाणे निर्माण होत असल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले आहे.