मुंबई : मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील तेजी मे महिन्यातही कायम असून, मे महिन्यात मुंबईत एकूण ११ हजार ५२० मालमत्तांची विक्री झाली आहे. याद्वारे सरकारला ९९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मुद्रांक शुल्कापोटी मिळाले आहे. गेल्यावर्षी मे महिन्यामध्ये ९८२३ मालमत्तांची विक्री मुंबईत झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात १७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
मे महिन्यात झालेल्या मालमत्ता विक्रीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, वय वर्षे २८ ते ५९ या वयोगटांतील खरेदीदारांचे एकूण प्रमाण ३५ टक्के इतके आहे. एप्रिल महिन्यात मुंबईत एकूण ११ हजार ६४८ मालमत्तांची विक्री झाली होती.
त्यावेळी अक्षय्य तृतीयेमुळे विक्रीला हातभार लागला होता. त्यावेळी मालमत्तांच्या एकूण विक्रीमध्ये ८० टक्के निवासी मालमत्ता होत्या, तर २० टक्के व्यावसायिक मालमत्ता होत्या.
मे महिन्यातदेखील हाच ट्रेंड कायम राहिल्याचे दिसून आले. ज्या घरांचे आकारमान ५०० ते एक हजार चौरस फूट आहे, अशा घरांच्या विक्रीचे प्रमाण ५१ टक्के इतके आहे.
घर खरेदी करण्यास इच्छुकांनी दोन बीएचके किंवा त्यावरील आकारमानाच्या घरांच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात घर घेण्यास लोकांनी पसंती दिल्याचाही ट्रेंड दिसून आला.