Join us

मुंबईत ११ हजार ५०० जणांकडे शस्रे; २२ जणांचे परवाने रद्द, परवानाधारक पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:44 AM

अन्य राज्यांतील परवान्यावर सुरक्षा पुरविणारेही रडारवर.

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणानंतर अन्य राज्यांतील बंदूक परवान्यावर मुंबईत सुरक्षा पुरविणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. मुंबईत जवळपास ११ हजार ५०० जणांकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती समोर येत आहे.  दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी २२ जणांचे परवाने रद्द केले आहेत. बाराहून अधिक अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पूर्वी बंदुका बाळगणारे परवानाधारक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यामागची राजकीय, सामाजिक कारणे अनेक आहेत. आत्मसंरक्षणासाठी बंदुका बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारे राजकीय, व्यावसायिक, सुरक्षारक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यात यावी त्याचबरोबर ज्यांचे परवाने संपलेले आहेत, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. अनेक सुरक्षारक्षक स्वतःकडे परराज्यातील शस्त्र परवाने बाळगत आहेत, त्यातील अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यांचे शस्त्र आणि परवाने जप्त करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

परवानाधारकांची होतेय चौकशी -

१) प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानाधारकाची चौकशी तसेच कुंडली काढण्यात येत आहे. परवानाधारकांचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? याचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

२) प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ‘मिल्स स्पेशल’ यांना दक्ष राहून सर्व राजकीय तसेच इतर घडामोडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

३) एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घोसाळकर हत्या प्रकरणानंतर ज्यांच्याकडे बंदूक परवाना आहे त्यांची माहिती घेण्यात येत आहे. ज्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत, तसेच ज्यांनी नियमानुसार वेळेत परवाना नूतनीकरण केले नाही अशा व्यक्तीचे परवाने रद्द करण्यात येत आहेत.

फेसबुक लाइव्ह करत गोळीबार - मिश्रा सुरक्षारक्षक म्हणून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मॉरिस नरोन्हाकडे कामाला होता. त्याने २००३ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला. याच बंदुकीतून नरोन्हाने फेसबुक लाइव्ह करत गोळीबार केला होता. मिश्राने उत्तर प्रदेशमधून परवाना मिळाल्यानंतर मुंबईत त्याचा वापर करत असताना त्याबाबतची नोंदणी मुंबई पोलिसांकडे केली नव्हती. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस