मुंबई : मुंबई महापालिकेच्या तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून रवानगी करण्यात येणार आहेत. तर मतदानाच्या दिवशी आणि आधीचे दोन-तीन दिवस पालिकेचे आणखी सुमारे ४० हजार कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असतील.
निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेतून ४० ते ४५ हजार कर्मचारी जाणार असून यापैकी पालिका शाळांतील सुमारे १,२०० शिक्षक आधीच बीएलओच्या कामासाठी पाठवण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी आणखी पाच हजार शिक्षक निवडणुकीच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहेत. मुलांच्या परीक्षा याच कालावधीत असल्याने पुढील दोन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत तरी शिक्षकांची कमतरता भासणार असून याचा शैक्षणिक कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिकेतील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांपैकी ४० ते ५० हजार कर्मचारी, अधिकारी निवडणुकीसाठी नेमण्यात आले आहेत.
‘त्यांचे’ वेतन रोखण्याचा निर्णय- लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. - त्यापैकी सुमारे १० हजार ४०० कर्मचारी निव़णुकीच्या कामासाठी तीन ते चार महिन्यांच्या कालावधीपासून गेले होते. - त्यामुळे पालिकेच्या सेवांवर परिणाम झाला होता. पालिकेने कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला होता. या कर्मचाऱ्यांना पुन्हा निवडणूक कर्तव्यावर पाठवू नये, असे स्पष्ट आदेशही प्रशासनाने काढले होते.