Join us  

मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री; राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:25 AM

गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील मालमत्ता विक्रीचा धडाका कायम असून, जुलै महिन्यात मुंबईत १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाली.

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील मालमत्ता विक्रीचा धडाका कायम असून, जुलै महिन्यात मुंबईत १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाली. याद्वारे राज्य सरकारला एकूण १०४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. चालू वर्षात एका महिन्यात झालेल्या विक्रीचा हा उच्चांक आहे. 

नाइट फ्रँक या बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या कंपनीच्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलैदरम्यान मुंबईत ८४,६५३ मालमत्तांची विक्री झाली आहे. याद्वारे राज्य सरकारला ६,९२९ कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत ही वाढ १६ टक्के झाली आहे. 

पश्चिम, पूर्व उपनगराला पसंती-

जुलै महिन्यात ५०० चौरस फूट ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतील प्रमाण ४९ टक्के इतके आहे. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतील प्रमाण ३८ टक्के आहे. घर खरेदीसाठी ग्राहकांची पसंती प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाली आहे. तेथील विक्रीचे प्रमाण हे ७३ टक्के आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ होताना दिसत असून, या विक्रीचे गेल्या जुलै महिन्यातील विक्रीच्या तुलनेतील प्रमाण ४१ टक्के अधिक आहे.

यंदा १६ टक्के वाढ-

गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबईत एकूण १० हजार २२१ मालमत्तांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये १६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर, जून २०२४ मध्ये मुंबईत ११ हजार ६७३ मालमत्तांची विक्री झाली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग