‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:19 PM2024-09-05T12:19:25+5:302024-09-05T12:21:00+5:30
'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील जवळपास ५ लाख ५९ हजार १२० अर्ज, तर दुसऱ्या टप्प्यातील ७ लाख ७८ हजार ४२८ अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, या योजनेच्या नोंदणीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली ही योजना मुंबई पालिकेच्या यंत्रणेमार्फत मुंबईत राबवली जात आहे. पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांद्वारे पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवाय, विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत अर्ज संख्या १३ लाखांवर पोहोचली असून, मुदतवाढीमुळे ती अजून वाढण्याची शक्यता आहे.
‘अर्ज छाननी वेगाने करा’-
अर्जांची छाननी वेगाने व्हावी, याकरिता पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयात १० संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा, अशा दोन पाळ्यांमध्ये काम करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. प्रत्येक पाळीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.