म्हाडाची १०० घरे एकाच वेळी खरेदी केल्यास १५ टक्के सूट! आता एकगठ्ठा विक्री धोरणाचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:42 AM2024-03-27T10:42:03+5:302024-03-27T10:43:10+5:30
म्हाडाची ५ हजार घरे पडून आहेत.
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार येथील सुमारे १० हजार घरांपैकी ५ हजार घरे अद्याप विक्रीविना पडून आहेत. ही घरे विकण्यासाठी म्हाडाने आता एक गठ्ठा घरांच्या विक्री धोरणाचा पर्याय स्वीकारला आहे. ही एक गठ्ठा १०० घरे व्यक्ती, संस्था किंवा सरकारी यंत्रणा यांना विकता यावी म्हणून म्हाडा आता काम करत आहे. १०० घरे एकाच वेळी खरेदी करणाऱ्यांना घरांच्या विक्री किमतीमध्ये १५ टक्के सवलत दिली जाईल.
कोकण मंडळाने विरार येथे सुमारे १० हजार घरे बांधली आहेत. मात्र, यातील ५ हजार विकली गेली नाहीत. लॉटरी काढून देखील ही घरे विकली जात नाहीत. ही घरे रिकामी आहेत. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च म्हाडावर पडत आहे. त्यामुळे ही घरे विकता यावीत म्हणून म्हाडाची कसरत सुरू आहे.
दरम्यान, दुसरीकडे विक्री विना पडून असलेल्या राज्यभरातील ११ हजार १८४ घरांना ग्राहक मिळावे म्हणून म्हाडाने खासगी बिल्डरांची मदत घेण्याचे ठरविले आहे. या दृष्टीने देखील काम सुरू झाले आहे. रिक्त घरांच्या विक्रीसाठी ५ पर्याय पुढे करण्यात आले आहेत. घरांच्या किमतीमध्ये सवलत देऊन १०० किंवा त्यापेक्षा अधिक घरे घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्थांना किमतीत सवलत मिळेल. हा विचार सध्या कोकण मंडळाने पुढे केला आहे.
मागणीनुसार घरे भाड्यावर मिळणार -
राज्यात जी घरे विकली जात नाहीत, त्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. यात घर भाडे खरेदी हप्त्यानुसार विक्रीसाठी निविदा, स्वारस्य अभिव्यक्तीच्या माध्यमातून संस्था नियुक्त करता येतील. घर भाड्याने देणे या पर्यायात खासगी कंपन्या, शासकीय-निमशासकीय संस्था, बँका, सेवाभावी संस्था, हॉस्पिटल, शासनाचे मोठे प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांना त्यांच्या मागणीनुसार घरे भाड्यावर मिळतील.
लिलाव पद्धतीने घराची विक्री करणे या पयार्यात घरांचा आढावा घेत त्यांचे मूल्यांकन निविदा मागवून लिलाव पद्धतीने घरे विकता येतील. मंडळांना प्राप्त प्रस्तावांमधून विपणन संस्था संस्था कमिशन व एजन्सी चार्जेसच्या धर्तीवर नेमता येतील.