दिलासा...! आजपासून १५ टक्के पाणीकपात मागे; ठाणे, भिवंडीचीही कपातीतून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:49 AM2024-03-06T09:49:51+5:302024-03-06T09:51:29+5:30
पालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाली आहे.
मुंबई : पालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झाली आहे. सद्य स्थितीत तीन ट्रान्सफॉर्मर सुरु होऊन त्या आधारे सर्व २० पंप सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी तिसऱ्या ट्रान्सफाॅर्मरवर आधारित पंपदेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात पालिकेकडून आजपासून मागे घेण्यात आली आहे.
पालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफाॅर्मरला २६ फेब्रुवारी रोजी आग लागल्याने यंत्रणा मुंबई आणि ठाणे, भिवंडी आणि परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.
१) मुंबई महानगरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारित पंप सुरू करण्यात आले आहेत.
२) दुरुस्तीसाठी परिरक्षणाअंतर्गत असलेला ट्रान्सफॉर्मरदेखील नुकताच सुरू झाला असून त्यावर आधारित पाच पंप चालू झाले आहेत. अशा रीतीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील सर्व म्हणजे २० पैकी २० पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.