सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:52 AM2024-03-07T09:52:17+5:302024-03-07T09:55:03+5:30

घरांचे बांधकाम सुरू.

about 1,700 houses to be built in century bombay dyeing plan approved under new policy | सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर

सेंच्युरी, बॉम्बे डाइंगमध्ये मिळणार १,७०० घरे, नव्या धोरणानुसार आराखडा मंजूर

मुंबई : गिरण्यांच्या चाळींमध्ये राहणाऱ्या दहा हजार कुटुंबांना प्रत्येकी ४०५ फुटांचे घर मिळणार असून, आता सेंच्युरी आणि बॉम्बे डाइंगच्या चाळीवरील नव्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. याद्वारे सुमारे १ हजार ७०० घरे मिळणार असून, उर्वरित गिरण्यांच्या चाळीवर बांधकाम करण्यासाठी वेगाने काम केले जाईल, असा आशावाद गिरणी कामगारांनी व्यक्त केला आहे.

गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या कामगारांच्या घरांसाठी आराखडा मंजूर केला आहे. गिरण्यांच्या चाळीत आजघडीला १० हजार कुटुंबे राहत आहेत. या गिरण्यांच्या चाळीवर उभारणाऱ्या इमारतीमध्ये प्रत्येक कुटुंबाला ४०५ चौरस फुटांचे घर मिळेल, असा हा आराखडा होता. म्हाडाने हा आरखडा तयार करत राज्य सरकारला सादर केला होता. नव्या धोरणानुसार हा आराखडा मंजूर केला होता. 

१)  नुकतेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९० हजार गिरणी कामगारांना घरे देण्याची घोषणा केली. गिरणी कामगारांच्या लढ्याचा हा विजय आहे. शेवटच्या गिरणी कामगाराला घरे मिळेपर्यंत, आमचा लढा सुरू राहील, असे गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी सांगितले.

२)  सेंच्युरी मिलच्या चाळीच्या घरांचे बांधकाम सुरू झाले असून वरळीमध्ये बावनचाळ येथे हे काम बांधकाम सुरू आहे.

३)  बाम्बे डाइंगशी संबंधित बांधकाम वडाळा येथील स्प्रिंग मिल येथे सुरू झाले आहे.

४)   सेंच्युरी आणि बॉम्बे डाइंगची मिळून सुमारे १ हजार ७०० घरे बांधली जातील.

५)   १७ गिरण्यांच्या चाळीवर या पध्दतीने बांधकाम सुरू केले जाणार आहे.

असा होता लढा :

१) गिरणी मालकांनी गिरण्या सुरु झाल्या तेव्हा गिरणी कामगारांसाठी चाळी बांधल्या होत्या. आता या चाळीमधील घरांचा एरिया १८० ते १६० फुट आहे. कालांतराने गिरण्या बंद झाल्याने काही गिरणी कामगार मुंबईबाहेर गेले. दरम्यानच्या काळात गिरणी मालकांनी यातील घरे विकली होती.

२) आता गिरण्यांच्या चाळीत गिरणी कामगारांसोबत इतर कामगारांची कुटूंबेही राहत आहेत. २००० साली सरकारने या चाळींमध्ये राहत असलेल्या कुटूंबांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती. 

३) परंतु या कामगारांच्या कुटूंबियांना सरकारने घरे द्यावीत, यासाठी गिरणी कामगारांच्या संघटनेने लढा उभा केला.लढ्याला यश येत असतानाच अगदी सुरुवातीला २२५ चौरस फुटांचे घर देण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र संघटनांना मोठे घर हवे होते. त्यानंतर झालेल्या बैठका, प्रस्ताव आणि शासन निर्णयात बदल करण्यात आले. आता अखेर ४०५ चौरस फुटांचे घर देण्यावर शिक्कमोर्तब झाले.

४) मधल्या काळात गिरण्यांच्या चाळीची पडझड होत चालली होती. चाळी जीर्ण झाल्या होत्या. परिणामी चाळीत राहत असलेल्या गिरणी कामगारांसह उर्वरित कामगार घराच्या प्रतीक्षेत 
होता.

Web Title: about 1,700 houses to be built in century bombay dyeing plan approved under new policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.