मुंबईमध्ये १८८ इमारती अतिधोकादायक; स्थलांतरित होण्यासाठी रहिवाशांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:53 AM2024-05-08T09:53:34+5:302024-05-08T09:54:37+5:30
मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे. ‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या इमारती राहण्यास धोकादायक असल्यामुळे त्यात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अतिधोकादायक इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील. त्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत आजही जुन्या, ब्रिटिशकालीन इमारती असून पावसाळ्यापूर्वी यामधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पालिकेमार्फत केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणातून १८८ अतिधोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक ११४ अतिधोकादायक इमारती पश्चिम उपनगरात मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी या भागात आहेत. शहर भागातील २७ आणि पूर्व उपनगरातील ४७ इमारतींचा यामध्ये समावेश आहे.
खासगी इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करा-
प्रत्येक खासगी इमारतीचे मालक व भोगवटादार यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या आणि ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता वापरात असलेल्या इमारतींची पालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे. ही सूचना जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांकडे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र सादर करायचे असते. अशा इमारतींच्या मालक, भोगवटादार, सहकारी संस्था यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
विभाग अतिधोकादायक इमारती
ए वॉर्ड ३
बी वॉर्ड २
सी वॉर्ड १
डी वॉर्ड ९
ई वॉर्ड २
एफ दक्षिण २
जी/उत्तर वॉर्ड ७
जी/दक्षिण वॉर्ड २
एच/पूर्व वॉर्ड १०
एच पश्चिम वॉर्ड १५
के पूर्व वॉर्ड १५
के पश्चिम वॉर्ड १६
एल वॉर्ड ६
एम पूर्व १
एम पश्चिम ८
एन वॉर्ड १३
पी उत्तर वॉर्ड २२
पी दक्षिण वॉर्ड १९
आर दक्षिण वराड ८
एस वॉर्ड ३
टी वॉर्ड १६