नूडल्सच्या पाकीटात लपवले होते २ कोटींचे हिरे; सीमा शुल्क विभागाची कारवाई
By मनोज गडनीस | Published: April 23, 2024 05:19 PM2024-04-23T17:19:27+5:302024-04-23T17:20:23+5:30
४ कोटींचे सोनेही पकडले.
मनोज गडनीस, मुंबई :मुंबई विमानतळावरून बँकॉक येथे अवैधरित्या हिरे घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. संबंधित व्यक्ती हिऱ्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे त्याची झडती घेतली असता त्याच्या सामानातील नूडल्सच्या पाकीटामध्ये २ कोटी २ लाख रुपये किमतीचे हिरे आढळून आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. या खेरीज, अबुधाबी, दुबई, बाहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांना एकूण ६ किलो १९९ ग्रॅम सोन्याच्या तस्करीप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे.