मुंबई : एकीकडे मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत असतानाच आता दुसरीकडे मालमत्ता भाड्याने घेणाऱ्या लोकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत १ लाख ९० मालमत्ता भाडेतत्त्वावर गेल्या आहेत. गेल्यावर्षी या कालावधीमध्ये १ लाख ६३ मालमत्ता भाड्याने गेल्या होत्या. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाचा आकडा १३ टक्क्यांनी जास्त आहे.
बांधकाम उद्योगाचे सर्वेक्षण करणाऱ्या एका कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. ज्या मालमत्ता भाड्याने गेल्या आहेत त्यात सर्वाधिक प्रमाण हे निवासी घरांचे आहे. ही घरे प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. आजच्या घडीला पश्चिम उपनगरात वांद्रे ते मालाडदरम्यान मोठ्या प्रमाणावर जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये मूळ घराच्या परिसरातच घर भाड्याने घेण्याचा लोकांचा कल आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात या मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भाड्याने गेल्या आहेत. तर, दुसरीकडे बीकेसीसोबतच दक्षिण मुंबईत कार्यालये भाड्याने घेण्याकडेही व्यावसायिकांचा कल दिसून येत आहे. कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे दक्षिण मुंबईकडे जाणारा प्रवास वेगवान झाल्यामळे अनेकांनी दक्षिण मुंबईत कार्यालये भाड्याने घेतली आहेत. दरम्यान, २०२३ च्या संपूर्ण वर्षात मुंबईत एकूण ३ लाख ३३ हजार मालमत्ता भाड्याने गेल्या होत्या.