मुंबई : दक्षिण आफ्रिकेला टूर नेण्याच्या नावाखाली घेतलेल्या २० लाख ४१ हजार रुपयांचा अपहार करून नऊ जणांची फसवणूक करण्याचा प्रकार कांदिवली पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पूर्वा हॉलिडेज कंपनीचा मालक तेजस शाह याला अटक करण्यात आली.
तक्रारदार जे. शाह (४६) हे कांदिवली परिसरात राहत असून एका सॉफ्टवेअर कंपनीत महाव्यवस्थापक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पूर्वा हॉलिडेजमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये तेजस शाहाशी संपर्क साधला. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या १२ दिवस आणि १३ रात्रीची माहिती देताना जेवणासह विमानाचे येण्या-जाण्याचे तिकीट, हॉटेल आणि ट्रिपमधील इतर ॲक्टिव्हिटीच्या समावेशाबाबत सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी तेजसने त्यांना ट्रिपच्या पॅकेजची माहिती दिली आणि तक्रारदाराने त्यांच्या कुटुंबीयांसह नऊ जणांचे बुकिंग करत २० लाख ४१ हजार ५०० रुपये आरोपीला दिले. मात्र, त्यानंतर तेजसला ट्रिपबाबत विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पुढे कार्यालय बंद करून पसार झाला. तर, १० एप्रिलला ट्रिप रद्द करत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले, मात्र पैसे परत केले नाही. अखेर याप्रकरणी गुन्हा नोंद होताच तेजसला कांदिवली पोलिसांनी अटक केली.