शिवडीतून २० लाखांचे एमडी जप्त; आरोपीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:44 AM2024-05-09T10:44:06+5:302024-05-09T10:44:55+5:30
याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून एका आरोपीला ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी विभागाच्या वरळी युनिटने शिवडी परिसरातून २० लाख रुपयांचे १०० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून एका आरोपीला ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत गुन्हे शाखेने २५ गुन्हे दाखल करून त्यात ६६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
त्यांच्याकडून ३४.८ किलोपेक्षा अधिक वजनाचे विविध अमली पदार्थ व १२०० कोडेन मिश्रित कफ सिरप बाटल्या, असा एकूण ३२.१६ कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच मेफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्तीचे एकूण १७ गुन्हे दाखल करून त्यामध्ये ५० आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून ११.८ किलोपेक्षा अधिक वजनाचे २३.४४ कोटी किमतीचे एमडी जप्त केले आहे.