मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे सुमारे 20 टक्के काम पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:52 AM2020-12-08T06:52:47+5:302020-12-08T06:53:11+5:30
Mumbai Road News : पश्चिम उपनरातून थेट दक्षिण मुंबई गाठण्यासह वाहतुकीचा वेग वाढून भविष्यातील मुंबई सुपर फास्ट व्हावी याकरिता मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार आहे.
मुंबई : पश्चिम उपनरातून थेट दक्षिण मुंबई गाठण्यासह वाहतुकीचा वेग वाढून भविष्यातील मुंबई सुपर फास्ट व्हावी याकरिता मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास जुलै २०२३ उजाडणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रियदर्शनी पार्क येथील बोगदा खणण्यासाठी चीनमधून आयात करण्यात आलेले ‘मावळा’ नावाचे टनेल बोरिंग मशीन आता मुंबईच्या पोटात उतरविण्यात आले असून, याद्वारे दोन बोगदे खणण्यात येतील. एका बोगद्यास नऊ महिने असे दोन बोगदे खणण्यास अठरा महिने लागणार असून, पहिल्या बोगदा खणण्याचे काम नव्या वर्षात सुरू हाेईल.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत असणार आहे. या प्रकल्पाची किंमत जवळपास साडेआठ हजार कोटी आहे. या प्रकल्पामध्ये चार अधिक चार लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. प्रकल्प तीन पॅकेजमध्ये विभागला आहे. प्रत्येक पॅकेजसाठी पर्यवेक्षणासाठी एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे.
प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र कोरोनामुळे प्रकल्पाची कामे काही प्रमाणात बाधित झाली. दरम्यान, अमरसन गार्डनमधील इंटरचेंज ४ वळण मार्ग, हाजी अली ८ वळण मार्ग आणि वरळी ६ वळण मार्ग आहेत. बोगदा खणणारी मशीन १२.१९ मीटर व्यासाची आहे. जो भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठ्या व्यासाचा टीबीएम आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास ११ मीटर असून, बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असणार आहे.
पार्किंग व्यवस्था
अमरसन गार्डन येथे प्रस्तावित २०० गाड्यांसाठी पार्किंग आहे.
हाजी अली येथे १२०० गाड्यांसाठी पार्किंग आहे.
वरळी येथे दोन पार्किंग असून, त्यांची क्षमता प्रत्येकी २०० गाड्यांची आहे.
वरळी येथे एक बीआरटीएस बस डेपो प्रस्तावित आहे.
फायदे
प्रवासाची वेळ कमी हाेणार
रस्त्यांची रहदारी कमी होईल.
वायू आणि ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी होईल.
बीआरटीएसद्वारे सार्वजनिक वाहतूक सुधारेल.
n अतिरिक्त हरित पट्ट्याची निर्मिती होईल.