Join us

अहो, माझी बॅग हरवली... २० हजार तक्रारी, रेल्वेच्या विसराळू प्रवाशांची हेल्पलाइनवर खणखण

By मनीषा म्हात्रे | Published: March 04, 2024 9:49 AM

सव्वादोन लाख कॉल ट्रान्सफर.

मनीषा म्हात्रे, मुंबई : अहो, माझी बॅग हरवल्यापासून ते रेल्वे डब्यातील भांडण, वैद्यकीय मदत, संशयास्पद वस्तू, चोरीसह विविध तक्रारीची खणखण लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ या हेल्पलाइनवर सुरू आहे. विसराळू प्रवाशांच्या सर्वाधिक २० हजार तक्रारींची नोंद झाली आहे. दुसरीकडे, अन्य हेल्पलाइनच्या कॉलचीही भर पडत असल्याने गेल्या वर्षभरात आलेल्या कॉलपैकी सव्वा दोन लाख कॉल हे संबंधित अन्य हेल्पलाइनवर ट्रान्सफर करण्यात आले आहे.  

रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून हेल्पलाइनचे कामकाज सुरू आहे. लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात हेल्पलाइनवर ३ लाख २९ हजार ५०० कॉल आले. २ लाख २३ हजार ४४ कॉल हे अन्य हेल्पलाइन संबंधित होते. १५१२ च्या जागरूकतेमुळे रेल्वे संबंधित प्रत्येक छोट्या मोठ्या माहितीसाठी १५१२ कडे प्रवाशांचा कल असतो. पीएनआर, गाडीची माहिती तसेच आरपीएफ संबंधित कॉलचा यामध्ये समावेश आहे. ते कॉल संबंधित हेल्पलाइनवर ट्रान्सफर करण्यात आले आहे. ७० हजार कॉल हे निरर्थक होते. यापैकी ३३ हजार ३३७ कॉल लोहमार्ग पोलिसांनी हाताळत कारवाई केली. यामध्ये सर्वाधिक कॉल हे रेल्वेत बॅग, सामान विसरण्यासंबंधित आहे. त्याखालोखाल दिव्यांग डब्यातील तक्रारीसंबंधित आहे. 

लोहमार्ग पोलिसांची वर्षभरात कारवाई  - 

तक्रारी                              कॉल                      गुन्हे दाखलबॅग हरवली                    २०, ०६९                         ३८ भांडण                           १, २५४                           २७ मद्यपी                            ४७८                               ०१ दिव्यांग डब्बा                ३, १८६                            ०३ जखमी                          ४०८                                ०३ विनयभंग                      ३०                                   ०७ आजारी व्यक्ती             ६७४                                ०१ स्टंट                             ५८                                  ००दगडफेक                     ५३                                  ०१ चोरी                             ६०                                  ०४ 

हेल्पलाइन तत्काळ प्रतिसाद :

हेल्पलाइनमुळे तत्काळ प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रवाशांना मदत होत आहे. हेल्पलाइनला अधिक अद्ययावत बनविण्याबरोबर वेटिंग कॉलसाठीही सुविधा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. - डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलिस

असे चालते कामकाज :

१)  ११ जणाची टीम तीन शिफ्टमध्ये ऑन ड्यूटी २४ तास कार्यरत असते. 

२)  एखादा कॉल आल्यानंतर तत्काळ स्थानकातील संबंधित पोलिसाला याबाबत माहिती देण्यात येते. 

३)  स्थानकावरील पोलिसांच्या मदतीने मदत  पोहचवली जाते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश चिंचकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अलका सवग यांची टीम हे कामकाज पाहते.

आरपीएफच्या कॉलचाही भर :

आरपीएफच्या १३९ च्या नियंत्रण कक्षासंबंधित तक्रारीचा सूरही १५१२ या हेल्पलाइनवर येत असल्याने अनेकदा ते कॉल तेथे फिरवण्यात येतात. १५१२ वर एकूण ३ लाख २९ हजार कॉल आले. त्यापैकी २ लाख २३ हजार ४४४ कॉल हे अन्य हेल्पलाइन संबंधित असल्याने तेथे फिरविण्यात आले. त्यामुळे बहुतांश वेळ हा कॉल ट्रान्सफर करण्यात जात आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वेपोलिस