लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांतील गृहविक्रीने जोर पकडलेला असतानाच आता महागड्या आणि आलिशान घरांची मागणी वाढल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत मुंबई, हैदराबाद, गुरगाव आणि बंगळुरू अशा चार शहरांत २५ घरांच्या विक्रीद्वारे तब्बल २,४४३ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून त्यांतील २१ घरे मुंबईतील आहेत. मुंबईतील ही महागडी घरे प्रत्येकी १०० कोटींहून अधिक मूल्यांना विकली गेली आहेत. यांपैकी ७ घरे दक्षिण मुंबईतील, तर दोन वांद्रे येथील आहेत.
बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या ॲनारॉक कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, महागड्या, आलिशान घरांच्या विक्रीमध्ये अव्वल ठरणाऱ्या मुंबईत या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यांत २१ आलिशान घरांची विक्री तब्बल २२०० कोटी रुपयांना झाली आहे. सर्वांत महागड्या घरांचे व्यवहार नोंदवण्यामध्ये मुंबईपाठोपाठ नंबर लागला आहे तो, गुरगाव शहराचा.
मागणीमुळे भाव १४ टक्क्यांनी वाढले-
ज्या घरांची गेल्या वर्षी किंमत ४० कोटी रुपये होती, अशा घरांच्या किमतीमध्ये वर्षभरात दोन टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. मात्र ज्या घरांची किंमत १०० कोटी रुपये होती, अशा घरांच्या किमतीमध्ये वर्षभरात १४ टक्क्यांची वाढ झाल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
फ्लॅटची किंमतही गगनचुंबी !
विशेष म्हणजे या २५ पैकी २० व्यवहार हे इमारतीमधील फ्लॅटसाठी करण्यात आले आहेत. त्याद्वारे एकूण १६९४ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. उर्वरित पाच बंगले असून त्यांची किंमत ७४८ कोटी ५० लाख रुपयांच्या घरात गेली आहे.
देशातील २५ महागड्या घरांच्या यादीत गुरगावमधील एका घराची विक्री तब्बल ९५ कोटी रुपयांना झाली आहे.
तसेच हैदराबाद येथील दोन घरे प्रत्येकी ८० कोटींना, तर बंगळुरूमध्ये एका आलिशान घराची विक्री ६७ कोटी ५० लाख रुपयांना झाली आहे. दरम्यान, २०२३ च्या संपूर्ण वर्षात मुंबईत आलिशान घरांच्या विक्रीचा आकडा हा ६१ इतका नोंदवण्यात आला असून त्याद्वारे ४,४५६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.