Join us

अबब, २१ किमी लांबीचा जलबोगदा; पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेची समांतर यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 9:45 AM

पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी मुंबई महापालिका जमिनीलगतच्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे बांधणार आहे.

मुंबई : जलवाहिनी फुटल्यावर गळती रोखेपर्यंत संपूर्ण विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. अशा प्रकारे पाणीपुरवठा बंद होऊ नये यासाठी मुंबई महापालिका जमिनीलगतच्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे बांधणार आहे. या योजनेंतर्गत पिसे- पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून मुलुंडपर्यंत २१ किमीचा जलबोगदा बांधला जाणार आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या  जलवाहिन्या काही कारणास्तव  फुटल्यास पाण्याची गळती सुरू होते. जलवाहिनी दुरुस्त करेपर्यंत साहजिकच संबंधित विभागातील पाणीपुरवठा बंद करावा लागतो.  जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या कामास अनेकदा वेळ लागतो. त्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जलबोगद्यांचा      पर्याय पुढे आला आहे. जलशुध्दीकरण केंद्रापासून पाणीपुरवठ्यासाठी अजस्र जलवाहिन्यांचे जाळे आहे. या जलवाहिन्या जमिनीवर आहेत. तर काही जलवाहिन्या या जमिनीखाली आहेत. त्या पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे  लावले आहेत.

प्रभावी पर्याय :

  काही कारणाने जलवाहिन्यांना धक्का बसतो आणि पाण्याची गळती सुरू होते. जलबोगदे हा त्यासाठी प्रभावी पर्याय आहे. अशा प्रकारच्या जलबोगद्याचे काम परळ  ते अमर महल आणि अमर महल ते ट्रॉम्बे पट्ट्यात सुरू आहे. 

  आता पिसे  पांजरापूर ते मुलुंड असा २१ किमीचा जलबोगदा तयार केला जाणार आहे. हे बोगदे जमिनीखाली १०० मीटर अंतरावर असतील. 

  या जलवाहिन्यांच्या जोडीला सध्याची जलवाहिन्यांची यंत्रणाही कायम ठेवली जाणार आहे. भविष्यात गरज भासल्यास दोन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करता येऊ शकेल.

टॅग्स :नगर पालिकापाणीकपातपाणी टंचाई